Delhi Floods: यमुनेच्या पाणीपातळीत घट, मात्र संकट अजूनही कायम!; आजही दिल्लीला अलर्ट | पुढारी

Delhi Floods: यमुनेच्या पाणीपातळीत घट, मात्र संकट अजूनही कायम!; आजही दिल्लीला अलर्ट

पुढारी ऑनलाईन: दिल्लीसह उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरूच आहे. दरम्यान काही ठिकाणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने दिल्ली जलमय झाली होती. दरम्यान यमुनेची पाणी पातळी काहीशी घटल्याने, रस्त्यावर साचलेले पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे वाहतुक पुनर्वत होत आहे. तर हिमाचल प्रदेशात पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. त्यामुळे मनाली येथील नदीच्या पाण्याचा वेग वाढला आहे. तसेच उत्तरप्रदेशात देखील पावसाने थैमान घातल्याने बहुतांश ठिकाणी पूरस्थिती (Delhi Floods) निर्माण झाली आहे.

Delhi Floods: संकट अजूनही कायम

यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने राजधानीच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. लाल किल्ल्याचा परिसरही पुरामुळे बाधित झाला आहे. दरम्यान यमुनेच्या पाणी पातळीत किंचित घट झाली आहे. दरम्यान रस्त्यावरील पाणी ओसरत आहे, मात्र अद्याप संकट अजूनही कायम आहे. कारण भारतीय हवामान खात्याकडून आजही यलो अलर्ट देण्यात आला असून, मध्यम पावसाची शक्यता व्यक्त केली होती. आज सकाळी दिल्ली-एनसीआरमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस (Delhi Floods) पडला आहे.

मेट्रो सामान्य वेगाने सुरू

दिल्लीतील आयटीओ परिसरात पाणी तुंबण्याची स्थिती निर्माण झाली आहे. लोकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. येथील बेला रोडवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यमुनेवरील मेट्रो पूल ओलांडताना लावलेले वेगाचे निर्बंध हटवण्यात आले आहेत. सर्व गाड्या आता सामान्य वेगाने धावत आहेत, अशी माहिती दिल्ली मेट्रोने दिली (Delhi Floods) आहे.

हिमाचल प्रदेशात पुन्हा पावसाला सुरूवात

उत्तराखंड येथील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर चमोली येथे दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओला पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे. हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये हलका पाऊस सुरू आहे. नुकत्याच आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यमुनोत्री महामार्ग 123 चामीजवळ मोठ्या प्रमाणात ढिगारा पडल्याने ब्लॉक झाला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती गंभीर

उत्तर प्रदेशमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याचे दिसून आले. मेरठमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने 15 गावांमध्ये गंभीर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह रस्त्यांवर वाहत होता. तसेच नोएडामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. एनडीआरएफकडून प्राण्यांची सुटका करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button