पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतातील पाच राज्यांतील अतिवृष्टीमुळे उडालेल्या हाहाकारातील बळींची संख्या १०० हून अधिक झाली आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशमध्ये दोन दिवसांनी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमला, सिरमौर, किन्नौरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने आज उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. भूस्खलनामुळे गंगोत्री आणि यमुनोत्री राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी बंद आहेत. येथे ३ ते ५ हजार लोक अडकले आहेत. दिल्लीतील जुन्या रेल्वे पुलावर यमुना नदीच्या पाण्याची पातळी 207.2 मीटर ओलांडली आहे. हरियाणातील हातिनी कुंड बॅरेजमधून ३.२१ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने राजधानीत पुराचा धोका वाढला आहे. गेली चार दिवस अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या राज्यनिहाय पुढील प्रमाणे : हिमाचल प्रदेश ३६, उत्तर प्रदेश ३४, जम्मू-काश्मीर १५, उत्तराखंड ९ आणि दिल्ली ५ अशी आहे.
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित केली आहे. हिमाचलच्या चंद्रतालमध्ये 250 पर्यटक अडकले आहेत. ८ तास पाऊस थांबला तर सर्वांची सुटका होईल, असे मुख्यमंत्री सखू यांनी म्हटले आहे.सोलनमध्ये दरड कोसळून दोन परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, चंदीगड-शिमला आणि चंदीगड मनाली राष्ट्रीय महामार्ग अंशतः खुले करण्यात आले आहेत.
हरिद्वारमधील तिबडी येथे रेल्वे रुळ तुटल्याने अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे.दिल्लीतील चाणक्य पुरी परिसर जलमय झाला आहे. काही मुत्सद्दी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरातही पाणी शिरले. हरियाणातील ९ जिल्ह्यांतील ६०० गावे जलमय झाली आहेत. अंबाला ४० टक्के पाण्याखाली आहे. चंदीगड-अंबाला महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्याचबरोबर अंबाला-कैथल-हिसार राष्ट्रीय महामार्ग अजूनही ठप्पच आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात सुमारे 300 लोक, बहुतेक पर्यटक, अजूनही अडकले आहेत. उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांमध्ये भूस्खलनात ९ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले आहेत. दिल्लीत, यमुनेने 205.33 मीटरच्या धोक्याचे चिन्ह ओलांडले आहे. नदी काठावरील अनेक सखल भागात पाणी शिरले. पाण्याची पातळी धोकादायकरित्या २०७.४९ मीटरच्या चिन्हाला स्पर्श करण्याच्या जवळ आहे, ही सर्वोच्च पातळी १९७८ मध्ये नोंदवण्यात आली होती.
हेही वाचा :