उत्तर भारतात मुसळधार; पण पावसाने ‘या’ राज्यांकडे फिरवली पाठ! | पुढारी

उत्तर भारतात मुसळधार; पण पावसाने 'या' राज्यांकडे फिरवली पाठ!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : एकीकडे उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. अतिवृष्‍टीमुळे पाच राज्‍यांमधील पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले असून, १०० हून अधिक नागरिक मृत्‍यूमुखी पडले आहेत. एकीकडे काही राज्‍यांमध्‍ये पावसाचे थैमान सुरु असताना दुसरीकडे देशातील १२ राज्‍यांकडे पावसाने पाठ फिरवल्‍याचे चित्र आहे. भारतीय हवामान विभागाच्या पावसाच्या आकडेवारीनुसार, तमिळनाडू वगळता सर्व दक्षिणेकडील राज्यांमध्ये या वर्षी 1 जून रोजी मान्सून सुरू झाल्यानंतर या हंगामात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

पावसाला का झाला विलंब?

पश्‍चिमी चक्रावत आणि मान्सून वाऱ्यांमुळे मागील पाच दिवस उत्तर भारतात अतिवृष्‍टी झाली. दुसरीकडे, अशी १२ राज्ये आहेत, जिथे कमकुवत मान्सूनमुळे पावसात कमालीची घट झाली आहे. भारतीय हवामान विभागाने म्‍हटले आहे की,. दक्षिण भारतातील मान्सून त्याच्या सुरुवातीपासूनच कमकुवत आहे, मुख्यतः चक्रीवादळ बिपरजॉयच्या प्रभावामुळे, पावसाला विलंब झाला आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस तुरळकच

तेलंगणा, केरळ, कर्नाटक, बिहार आणि झारखंड या मध्य, दक्षिण आणि ईशान्येकडील राज्ये अजूनही कमकुवत मान्सूनमधून जात आहेत. १ जूनपासून सुरू झालेल्या मान्सूनसाठी भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पावसाच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, तामिळनाडू वगळता सर्व दक्षिणेकडील राज्यांमध्ये या हंगामात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

पिकांच्या पेरणीला लांबणीवर

जुलैच्या पहिल्या आठवड्यात दक्षिणेकडील, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस मर्यादित होता. मुख्य भूभागावर फारसा पाऊस झाला नाही. याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळच्या काही भागांत पिकांच्या पेरणीला उशीर झाला आहे. कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्‍याचे जाहीर केले आहे. या राज्‍यांमध्‍ये पिकांच्‍या पेरणी लांबणीवर पडले आहे.

तेलंगणात मागील वर्षाच्‍या तुलनेत ६५ टक्‍के तूट

तेलंगणा स्टेट डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग सोसायटी (टीएसडीपीएस) नुसार, राज्यात १ जून ते ११ जुलै या कालावधीत केवळ १५०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच साधारण १९७.५ मिमी पावसापेक्षा खूपच कमी पाऊस झाला. गेल्या वर्षी या कालावधीत राज्यात ३९५.६ मिमी अतिवृष्टीची नोंद झाली होती. ‘टीएसडीपीएस’ बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत तेलंगणामध्ये ६५ टक्के पावसाची तूट आहे. त्यात म्हटले आहे की, २४ जूनपासून मान्सून सुरू झाला आणि तो अनियमित झाला. विकाराबाद, संगारेड्डी, सिद्धीपेठ आणि नारायणपेट येथे सरासरीपेक्षा किंचित जास्त पावसाची नोंद झाली आहे. बाकी सर्व २९ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे.

कर्नाटककडेही पावसाची पाठ

कर्नाटककडेही पावसाने पाठ फिरवली आहे. बंगळूरसाठी एक महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या कृष्णराजसागर (KRS) धरणासारखी मोठी धरणे जवळपास कोरडी पडण्याच्या मार्गावर आहेत. पाण्याची पातळी कमाल १२४.८ फुटांपेक्षा ३० फूट खाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीपातळी १०६.५ फूट होती. त्याचवेळी हैदराबाद आणि कर्नाटक भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या तुंगभद्रा धरणात सध्या फक्त ४.१ टीएमसी पाणीसाठा आहे, गेल्या वर्षीच्या ४३.९ टीएमसीपेक्षा खूपच तो कमी आहे. कर्नाटक स्टेट नॅचरल डिझास्टर मॉनिटरिंग सेलच्या मते, कर्नाटकातील कावेरी आणि तुंगभद्रा सारख्या नद्यांना पाणी पुरवणाऱ्या पाणलोट क्षेत्रांमध्ये पावसाळ्याच्या पहिल्या 35 दिवसांमध्ये सरासरीच्या एक तृतीयांशपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

केरळमध्‍ये ३१ टक्‍के पावसाची कमतरता

केरळमधील अनेक भागात ३१ टक्के पावसाची कमतरता आहे. इथे पाऊस फारच कमी पडतो. केरळ आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर केरळमधील काही भाग वगळता इतर बहुतांश भागात कमी पाऊस झाला असून, १४ पैकी ९ जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्र कमतरता आहे.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश मुसळधार पावसाचा इशारा

आयएमडीचे शास्त्रज्ञ जेनामानी यांनी सांगितले की, पश्चिमी चक्रवात आणि मान्सून वाऱ्याच्या मिश्रणामुळे उत्तरेला मुसळधार पाऊस पडला. ते पूर्वेकडे सरकले असून येत्या काही दिवसांत उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरात दबाव निर्माण होऊन काही दिवसांत दक्षिण भारतात पाऊस पुन्हा सुरू होईल अशी आमची अपेक्षा आहे.

‘या’ राज्‍यांत पावसाचा अभाव

पूर्वेकडील बिहार राज्यात 33 टक्के, झारखंड 43 टक्के आणि ओडिशामध्ये २६ टक्के कमी पाऊस झाला. मात्र, पश्चिम बंगालमध्ये पुरेसा पाऊस झाला आहे. आसाम वगळता ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये पावसाची कमतरता आहे. मात्र, या राज्यांमध्ये पडलेल्या पावसाची सरासरी देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button