पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताच्या चांद्रयान-३ ने आज (दि.१४) चंद्राच्या दिशेनं महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. चांद्रयान-३ आता चंद्रापासून काही पावलेच दूर आहे. हे यान चंद्रावर पोहचण्यासाठी आता काउंटडाउन सुरू झाले असून, ते चंद्रापासून आता काही पावलेच दूर आहे. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट दरम्यान या मोहिमेचा महत्त्वाचा टप्पा असून, यासाठी उत्सुकता असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून स्पष्ट केले आहे. (Chandrayaan-3 Mission) पुढील ऑपरेशन बुधवारी १६ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री ०८.३० वाजता नियोजित आहे, असेही इस्रोने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने जाहीर (इस्रो) केले आहे की, या यानाने आज १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेबारा वाजता चंद्राभोवतीची आपली कक्षा आणखी कमी केली आहे. आजच्या ऑपरेशनने चांद्रयान-३ ने 150 किमी x 177 किमी टप्पा पूर्ण करत, चंद्राच्या आणखी जवळ-गोलाकार कक्षा गाठली आहे. यामुळे भारताचे अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ(Chandrayaan-3 Mission) गेले आहे, असेही इस्त्रोने सांगितले आहे.
चांद्रयान-३ चा प्रवास सुस्थितीत सुरू आहे. हे यान चंद्राच्या कक्षेपासून १०० कि.मी. अंतरावर पोहोचल्यावर मात्र आव्हानात्मक आणि अडचणीचा टप्पा सुरू होणार असल्याची माहिती भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली होती. ९ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी हे यान चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावरील कक्षेत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. हा टप्पा खूप गुंतागुंतीचा (Chandrayaan-3 Mission) असणार आहे, असेही इस्रोने म्हटले आहे.
चंद्रावर पाऊल टाकण्यात येणारे भारताचे हे तिसरे सर्वात मोठे अभियान आहे. हे यान ६४२ टन वजनी, ४३.५ मीटर उंचीच्या एलव्हीएम-3-एम 4 रॉकेटने सोडण्यात आले आहे. हे देशातील सर्वात शक्तिशाली बाहुबली रॉकेट आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे सॉफ्ट लँडिंग यशस्वी झाल्यास, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरेल. चांद्रयान-3 ची मोहीम केवळ अंतराळ संशोधनात भारताच्या वाढत्या तांत्रिक क्षमतेचे प्रदर्शन नाही तर महत्त्वपूर्ण वैज्ञानिक शोध लावणे हे देखील या मोहिमेचे उद्दिष्ट आहे, असेही इस्रोने म्हटले आहे.