बंगळूर : जगभरातील अंतराळ संशोधन संस्थांचे चंद्राच्या दक्षिण धु्वाकडेच अधिक लक्ष जात असल्याचे दिसून येते. चीनची 'चेंगी-7' मोहीम असो किंवा अमेरिकेच्या 'नासा'ची 'आर्टेमिस-3' मोहीम असो, या मोहिमांमध्येही चंद्राच्या दक्षिण धु्वावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आता भारताचे 'चांद्रयान-3'ही मोहीमही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला लक्ष्य करूनच आखण्यात आली आहे. त्याचे कारण काय हे पाहणे महत्त्वाचे आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून 14 जुलै रोजी दुपारी 2.35 वाजता 'चांद्रयान-3' अंतराळात प्रक्षेपित केले जाईल, असे 'इस्रो'ने जाहीर केले. 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित केलेली चांद्रयान-2 मोहिमेचा हा पुढचा टप्पा आहे. 6 सप्टेंबर 2019 च्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-2 मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. 'इस्रो'च्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 चे प्रक्षेपण केल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि त्यानंतर लँडर विक्रम आणि रोव्हर प्रग्यान हे 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील. महत्त्वाचे म्हणजे, चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवाच्या 70 अंश अंतरावर असलेल्या मैदानी प्रदेशात उतरले होते, त्याच्याच आसपास चांद्रयान-3 उतरणार आहे. यावेळी जर सर्वकाही सुरळीत पार पडले तर दक्षिण ध्रुवावर उतरणारी ही जगातील पहिली मोहीम ठरणार आहे. याआधी चंद्रावर जी अंतराळयाने उतरली, ती सर्व विषुववृत्ताजवळील भागात उतरली आहेत. चंद्राच्या उत्तर किंवा दक्षिण विषुववृत्ताच्या काही परिसरात याआधी याने उतरली आहेत.
सर्व्हेयर 7 हे यान आतापर्यंत विषुववृत्ताच्या थोडे पुढे जाऊन दक्षिण ध्रुवाच्या 40 अंश अंतरानजीक उतरले होते. 'नासा'ने ही मोहीम 10 जानेवारी 1968 साली हाती घेतली होती. चंद्राच्या विषुववृत्तीय भागावरच आतापर्यंत अनेक अंतराळयाने का उतरली, यामागे काही कारणे आहेत. चीनचे चेंगी-4 हे अंतराळयान विषुववृत्ताच्या पुढे जाऊन उतरणारे पहिले अंतराळयान ठरले होते. चेंगी ही चीनची चंद्रमोहीम असून त्यांच्या चांद्रसंशोधन कार्यक्रमातील दुसरा टप्पा होता. ही बाजू पृथ्वीवरून दिसत नाही. विषुववृत्ताजवळ उतरणे सोपे आणि सुरक्षित असल्याचे मानले जाते. याउलट चंद्राचा ध्रुवीय प्रदेश अधिक कठीण आहे. येथील भूपृष्ठभाग सपाट नाही. येथील बरेच भाग पूर्णपणे अंधारात असून तिथे सूर्यप्रकाश पोहोचत नाही.
उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुव आणखी गडद अंधारात आहे. याठिकाणचे उणे 230 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तापमान असते. सूर्यप्रकाशाचा अभाव आणि अत्यंत कमी तापमानामुळे उपकरणांकडून काम करणे अवघड होते. याशिवाय दक्षिण ध्रुवावर काही सेंटिमीटर्सपासून ते काही हजार किलोमीटर्सपर्यंत विविध आकारांची विवरे आहेत. अतिशय खडतर वातावरण असल्यामुळे दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत चंद्रयान मोहिमा झालेल्या नाहीत; पण अनेक ऑर्बिटर मोहिमांनी पुरावे दिले आहेत की, याठिकाणी शोधमोहीम घेणे उत्कंठावर्धक असणार आहे. विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असण्याची शक्यता वर्तवली जाते. शिवाय, अत्यंत थंड तापमान असल्यामुळे याठिकाणी अडकलेली एखादी वस्तू काहीही बदल न होता, अनेक वर्षांनंतरही गोठलेल्या अवस्थेत मिळू शकते. विवरांत जीवाश्म आढळल्यास त्यांच्या अभ्यासातून सूर्यमालेच्या निर्मितीच्या काळातील घडामोडींवर प्रकाश टाकता येऊ शकतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 2008 साली भारताने राबवलेल्या चांद्रयान-1 मोहिमेतून चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते.