Maharashtra Politics | १६ आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस | पुढारी

Maharashtra Politics | १६ आमदार अपात्रता प्रकरण : ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री ‍‍एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उत्तर देण्यास दोन आठवड्याचा अवधी दिला आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर लवकर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका ठाकरे गटाकडून अलीकडेच सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. (Maharashtra Politics)

सत्ता संघर्षाचा निकाल देतेवेळी सर्वोच्च न्यायालयाने १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांनी निकाली काढावा, असे आदेश दिले होते. सदर आदेश देऊन दोन महिने उलटले तरी अध्यक्ष कोणतेही पाऊल उचलण्यास तयार नाहीत, त्यामुळे त्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, असे सांगत ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली आहे. अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्ष जाणूनबुजून टाळाटाळ करीत असल्याचेही प्रभू यांनी याचिकेत म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर मागितले आहे.

सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची याचिका दाखल झाल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी शिवसेनेच्या ४० तसेच ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीसा दिल्या होत्या, हे विशेष. अपात्रता प्रकरणी सात दिवसात लेखी उत्तर देण्यास या आमदाराना सांगण्यात आले आहे. लेखी उत्तर आले नाही तर विधिमंडळ थेट कोणतीही कारवाई करणार नाही. तर कारवाई करण्याआधी विधानसभा अध्यक्ष आमदारांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलावतील. त्यावेळी प्रत्येक आमदाराला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, असे नार्वेकर यांनी सदर नोटिशीत म्हटलेले आहे. (Maharashtra Politics)

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने याआधी निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील गटाच्या १६ आमदारांना अपात्रेचा ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला होता.

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील, असे घटनापीठाने स्पष्ट केले होते. यामुळे शिंदे सरकारला दिलासा मिळाला होता. अपात्रतेचे प्रकरण निकाली काढण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील काळात कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button