Chandrayan 3 : आता फक्त काही तास; चांद्रयान 3 चे आज प्रक्षेपण; मोहिमेकडे संपू्र्ण जगाचे लक्ष | पुढारी

Chandrayan 3 : आता फक्त काही तास; चांद्रयान 3 चे आज प्रक्षेपण; मोहिमेकडे संपू्र्ण जगाचे लक्ष

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chandrayan 3 : आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून आज शुक्रवारी 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता ‘चांद्रयान-3’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार आहे. चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. काही तासातच काउंट डाऊन सुरू होईल. ‘इस्रो’कडून या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून त्याची रिहर्सल देखील केली आहे. 6 सप्टेंबर 2019 च्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-2 मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे आता चांद्रयान 3 या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

ही मोहीम 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपित केलेली चांद्रयान-2 मोहिमेचा हा पुढचा टप्पा आहे. ‘इस्रो’च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 (Chandrayan 3) चे प्रक्षेपण केल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि त्यानंतर लँडर विक्रम आणि रोव्हर प्रग्यान हे 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील. महत्त्वाचे म्हणजे, चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवाच्या 70 अंश अंतरावर असलेल्या मैदानी प्रदेशात उतरले होते, त्याच्याच आसपास चांद्रयान-3 देखील उतरणार आहे.

Chandrayan 3 : एलव्हीएम 3 बद्दल…

यान नेणारे एलव्हीएम 3 रॉकेट हे देशाचे सर्वात अवजड रॉकेट
वजन 640 टन, लांबी 43.5 मीटर
चांद्रयानाचे एकूण पेलोड जवळपास 3 टन
हे यान थोड्याच वेळात चांद्रयान 3 ला घेऊन अवकाशात झेपावणार

Chandrayan 3 : चांद्रयान 3 मोहिमेतील आव्हाने

चांद्रयान 3 मोहीम चांद्रयान 2 पेक्षाही अधिक आव्हानात्मक असणार आहे. चंद्रावर लँडिंग खूप कठीण आहे. मंगळ हा चंद्रापेक्षा पृथ्वीपासून कितीतरी लांब आहे. तरीही तेथे लँडिंग सोपे आहे. कारण मंगळावर वातावरण आहे. मात्र, चंद्रावर वातावरण नाही. तावरण नसल्याने चंद्रावर उतरण्यासाठी प्रॉपेलंटचा (प्रणोदक) वापर केला जातो. ते मर्यादित प्रमाणातच नेता येते.

पृथ्वीवर जीपीएसच्या मदतीने लोकेशनची माहिती मिळते. चंद्रावर लोकेशन दाखविणारे सॅटेलाईट नाही. त्यामुळे लोकेशनही कळत नाही आणि पृष्ठभागापासूनचे अंतरही कळत नाही. चांद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. इथे सूर्य फक्त क्षितिजालगत असतो. त्यामुळे मोठाल्या सावल्या पडतात. काहीही नीट दिसत नाही. त्यामुळे पुढील तीन आव्हाने या मोहिमेत महत्वाची असणार आहेत. (Chandrayaan-3)

1) लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग
2) चंद्राच्या पृष्ठभागावरून रोव्हर चालविणे
3) चंद्रावरील विविध घटकांचे वैज्ञानिक परीक्षण

Chandrayan 3 : चांद्रयान-3 चे महत्त्व काय?

चंद्राच्या अशा भागात लँडर उतरणार आहे, ज्याची काहीही माहिती आजवर उपलब्ध नाही.
चंद्रावरील सोने, प्लॅटिनियम, युरेनियम आदी खनिज संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे.
अंतराळात चीनला प्रतिआव्हान देणे, या द़ृष्टिनेही ही मोहीम महत्त्वाची आहे.

हे ही वाचा :

Chandrayaan-3 | ‘बाहुबली रॉकेट! ‘चांद्रयान-३’ मोहीम १०० टक्के यशस्वी होणारच

Chandrayaan-3 : मागील चुका चांद्रयान-3 मोहिमेत सुधारल्या!

चांद्रयान-3 मोहीम : चंद्राच्या दक्षिण धु्वाकडेच लक्ष का?

Back to top button