भाजप आमदार पुर्णेश मोदींकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल | पुढारी

भाजप आमदार पुर्णेश मोदींकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात गुजरातमध्ये मानहानीचा खटला दाखल करणारे भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘मोदी’ आडनावासंबंधी राहुल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात पुर्णेश यांनी याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे या याचिकेवर सुनावणी घेत कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधींना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करीत आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती न्यायालयात केली आहे.

गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. अशात सुनावणीदरम्यान आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती कॅव्हेटच्या माध्यमातून भाजप नेत्याने केली आहे.

न्यायालयाने कुठल्याही प्रकरणात एक बाजू ऐकून घेत निर्णय घेवू नये, यासाठी कॅव्हेट दाखल केली जाते. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मार्च २०२३ मध्ये सूरत न्यायालयाने त्यांना कलम ५०४ अन्वे दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कर्नाटक मधील कोलार मधील एका सभेला संबोधित करतांना त्यांनी मोदी आडनाव संबंधी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर भाजप आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पुर्णेश यांनी त्यांच्याविरोधात मानहानिचा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण मोदी समाजाचा अपमान झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

Back to top button