पुढारी ऑनलाईन : 'मोदी' आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्याची त्यांची मागणी नुकतीच गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दरम्यान, राहुल गांधी यांच्या विरोधात खटला दाखल करणारे भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले.
राहुल गांधी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्णेश मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, गुजरात उच्च न्यायालयाने 'मोदी' आडनाव टिप्पणी प्रकरणात ज्या दिवशी निकाल दिला त्याच दिवशी म्हणजे ७ जुलै रोजी कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान, काँग्रेस पक्षाने ७ जुलै रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे जाहीर केले होते.
कॅव्हेट दाखल झाल्यामुळे मानहानीच्या प्रकरणात दुसऱ्या पक्षकाराची म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय न्यायालय त्याबाबतच्या निर्णयावर निकाल अथवा स्थगिती देत नाही. पूर्णेश मोदी यांनीही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची विनंती आहे.
गुजरात उच्च न्यायालयाने 'मोदी आडनाव' टिप्पणीविरोधातील मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगितीस नकार देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने २ मे रोजी गांधींच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण केली आणि आदेश राखून ठेवला होता. राहुल गांधींच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान असा युक्तिवाद केला होता की, जामीनपात्र, अदखलपात्र गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा म्हणजे त्याची लोकसभेची खासदारकी कायमची जाऊ शकते."
'मोदी' आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणार्या राहुल गांधींच्या अर्जावर गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत प्रचारक यांनी ७ जुलै रोजी निकाल दिला. (Rahul Gandhi defamation case)
सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले आहे. स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी हा जबर धक्का आहे.
हे ही वाचा :