पुढारी ऑनलाईन : दिवसेंदिवस तंत्रज्ञान जितके सहज आणि सोपे होत आहे. तितकी व्यक्तीची गोपनियता देखील धोक्यात येत आहे. यासंदर्भातील नुकतीच चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. १२ हजारांहून अधिक SBI कर्मचाऱ्यांचा टेलिग्राम डेटा लीक झाला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांच्या गोपनियतेचे उल्लंघन (SBI Data leaked) झाले आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे' ने दिले आहे.
भारतातील प्रतिष्ठित मानली जाणाऱ्या बँक एसबीआयच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यामध्ये १२ हजारांहून अधिक एसबीआय कर्मचाऱ्यांचा डेटा टेलिग्राम या चॅनेलवरून लीक झाला आहे. यामध्ये एसबीआय कर्मचाऱ्यांसह काही खातेधारकांचा देखील समावेश आहे. या डेटामध्ये कर्मचारी आणि खातेधारकांचे SBI पासबुक, आधार कार्ड आणि मतदार कार्डच्या स्क्रीनशॉटसह इतर वैयक्तिक संवेदनशील माहिती लीक झाली आहे, यामुळे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या डेटा सुरक्षेसंदर्भातील (SBI Data leaked) चिंता वाढली आहे, असे वृत्तात पुढे म्हटले आहे.
गेल्या शुक्रवारी टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ६०८ फॉलोअर्स असणाऱ्या एका अकाउंटवरून एक संशयास्पद मेसेज मिळाला होता. यानंतर एसबीआय कर्मचारी खाते क्रमांक, फोटो आयडी, कामाचे आयडी, आयपी, फोन नंबर, पत्ते, नावे आणि इतर असंख्य वैयक्तिक तपशीलांची फाइल लीक झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२ हजार कर्मचाऱ्यांचा डेटा लीक (SBI Data leaked) झाल्याचा दावा करण्यात आला आहे.