प. बंगाल पंचायत निवडणुकीत ‘तृणमूल’चा ‘डंका’

प. बंगाल पंचायत निवडणुकीत ‘तृणमूल’चा ‘डंका’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हिंसाचारामुळे देशभरात बहुचर्चित ठरलेल्‍या पश्‍चिम बंगाल पंचायत निवडणुकीची मतमोजणी आज ( दि. ११ )सकाळपासून सुरु आहे. दुपारपर्यंतच्‍या निकालात तृणमूलने १४ हजार ७६७ जागांवर विजय मिळवला आहे. तसेच २ हजार ६४६ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपला ३ हजार ३४४ जागा जिंकल्‍या असून ६८३ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसने ७८३ जागा जिंकल्या असून २१९ जागांवर आघाडीवर आहे. सीपीआय(एम) ने १,०८६ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. त्याचबरोबर ४८२ जागांवर आघाडीवर आहे. ( West Bengal Panchayat Election )

पश्‍चिम बंगालमध्‍ये ८ जुलै रोजी रोजी पंचायत निवडणुकांसाठी मतदान झाले. हिंसाचार आणि बूथ कॅप्चरिंगच्या घटनांमध्ये ८०.७१ टक्‍के मतदानाची नोंद झाली होती. 8 जून रोजी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून १० जुलैपर्यंत निवडणूक हिंसाचारात ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. ( West Bengal Panchayat Election )

मतदान केंद्र ताब्‍यात घेण्‍यात आल्‍याच्‍या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने सोमवारी (10 जुलै) १९ जिल्ह्यांतील ६९७ मतदान केंद्रांवर फेरमतदान घेतले. ६९.८५ टक्‍के मतदान झाले होते.

मतमोजणी दिवशीही हिंसाचाराचे सत्र सुरुच

आज मतमोजणीवेळीही हिंसाचाराचे सत्र सुरुच राहिले आहे. सकाळी मतमोजणीसाठी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात असताना दक्षिण 24 परगणा येथील डायमंड हार्बर येथील एका बूथवर हा स्फोट झाला. मालदा येथील मतमोजणी केंद्रावर एक व्यक्ती मतपेटी घेऊन पळून गेला.हावडा येथील मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांना पांगवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला. यावेळी जमावाने मतमोजणी केंद्रात घुसण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याने प्रचंड तणाव निर्माण झाला. नादिया जिल्ह्यात लोकांनी पोलिसांना मारहाण केली. जंगीपारा मतमोजणी केंद्रावरील मतांच्या लुटीच्या निषेधार्थ फुरफुरा शरीफ तलतला हाट येथे ग्रामस्‍थांनी रास्ता रोको केला.

हिंसाचाराच्या विरोधात लढा सुरूच राहील : राज्यपाल

पश्‍चिम बंगालमध्‍ये निवडणूक काळात झालेल्‍या हिंसाचाराबाबत बोलताना राज्यपाल सीव्ही आनंद बोस म्हणाले की, हिंसाचारावर आम्ही नक्कीच कडक कारवाई करू. हिंसाचारामुळे नव्या पिढीच्या भवितव्यावर परिणाम होत आहे. सर्व अधिकारी गुंड आणि कायदा मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करतील. नवीन पिढीसाठी आम्ही बंगालला सुरक्षित ठिकाण बनवू. बंगालमधील वाढत्या हिंसाचाराविरोधात सातत्याने लढा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news