

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली-मेरठ महामार्गावरील गाझियाबादजवळ (Ghaziabad Accident News) स्कूल बस आणि कारच्या धडकेत ६ जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (दि.११) सकाळी घडली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरू केले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.
नरेंद्र यादव (वय ४५), अनिता यादव (वय ४२), बबिता धर्मेंद्र यादव (वय ३८), हिमांशू नरेंद्र यादव (वय १२), करकित नरेंद्र यादव (वय १५), वंशिका धर्मेंद्र यादव (वय ७), अशी मृतांची नावे आहेत. तर धर्मेंद्र यादव (वय ४२) आणि आर्यन धर्मेंद्र यादव (वय ८) हे गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब मेरठमधील इंचोलीच्या धनपूर गावचे रहिवासी होते.
मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी क्रॉसिंग पोलीस स्टेशन परिसरात दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवरील ताज हायवेच्या फ्लायओव्हरवर स्कूल बस आणि कारची धडक झाली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. त्यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.
एक्स्प्रेस वेवर स्कूल बस चुकीच्या दिशेने येत होती. कारमधील कुटुंब मेरठहून दिल्लीच्या दिशेने जात होते. हे कुटुंब खातू श्यामला भेटण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कार आणि बसची धडक इतकी जोरात होती की, कारचा चक्काचूर झाला. त्यामुळे मृतदेह गाडीत अडकले. गॅस कटरने कार कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गाझियाबादमधील रस्ता अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी शोकसंतप्त कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा