

गुंटूर (आंध्र प्रदेश), पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील धरशीजवळ बस सागर कालव्यात कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या अपघातात १५ जण जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. (Andhra Pradesh)
आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (APSRTC) भाड्याने घेतलेल्या बसला हा अपघात झाला आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी मध्यरात्री ती सागर कालव्यात कोसळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये दोन चालकांसह ४७ प्रवासी होते. ते एका लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहण्यासाठी पोडालीहून काकीनाडा येथे जात होते. या दरम्यान बसला अपघात झाला. (Andhra Pradesh)
जखमींना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले, तर गंभीर जखमींना ओंगोले येथील आरआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अब्दुल अजीज (वय ६५), अब्दुल हानी (६०), शेख रमीज (४८), मुल्ला नूरजान (५८), मुल्ला जानी बेगम (६५), शेख शबीना (३५) आणि शेख हीमा (७) अशी मृतांची नावे आहेत.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
हे ही वाचा :