

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन : मुसळधार पावसाने उत्तर भारतात हाहाकार (Raining Havoc) उडाला आहे. मागील तीन दिवसांत ३७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यमुना नदीने सोमवारी २०५.३३ मीटरची धोक्याची पातळी ओलांडली होती. आज सकाळी ही पातळी २०६.२४ वर पोहोचली. हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून एक लाख क्युसेक विसर्ग नदीत सुरू आहे. त्यामुळे दिल्लीत पुराचा धोका निर्माण झाला आहे.
एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, यमुना (Raining Havoc) नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरुवात केली आहे. त्यांना शहरातील विविध भागातील शिबिरे आणि कम्युनिटी सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. यमुना नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. पूरग्रस्त भागात १६ नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. अतिवृष्टीमुळे जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत प्रभावित झाला असल्याने, लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने प्रभावित राज्यांमध्ये मदत आणि बचाव कार्याला सुरूवात केली आहे.
अनेक नद्यांना पूर आला आहे. शहरे आणि शहरातील अनेक रस्ते आणि इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. हिमाचल प्रदेशातील पूरस्थिती कायम आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे घरे आणि शेकडो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. भूस्खलनामुळे नद्या आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडत आहे. त्यामुळे अनेक रस्ते आणि महामार्ग बंद करण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
तर दुसरीकडे, राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पूरस्थिती भागात मदत कार्य गतिमान करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राजस्थानमध्ये मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, रेल्वे ट्रॅक आणि रुग्णालयेही पाण्याखाली गेली आहेत.
हेही वाचा