Raining Havoc : उत्तर- पश्चिम भारतात पावसाचा कहर; भूस्खलन, ढगफुटीमुळे ३४ लोकांचा मृत्यू | पुढारी

Raining Havoc : उत्तर- पश्चिम भारतात पावसाचा कहर; भूस्खलन, ढगफुटीमुळे ३४ लोकांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर आणि पश्चिम भारतात मुसळधार पावसाने कहर केला आहे. हिमाचल प्रदेशसह पर्वतीय राज्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या २४ तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी, घरांची पडझड, झाडे आणि वीज कोसळून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचलमध्ये सर्वाधिक ११ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय यूपीमध्ये ८, उत्तराखंडमध्ये ६, दिल्लीत ३, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि पंजाबमध्ये प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचलच्या मंडीत बियास नदीच्या प्रवाहात ४० वर्षे जुना पूल वाहून गेला आहे. दिल्लीत ४१ वर्षांनंतर जुलैमध्ये एका दिवसात १५३ मिमी पाऊस झाला आहे. पावसामुळे उत्तर रेल्वेने १७ गाड्या रद्द केल्या आहेत. तर १२ गाड्यांचे मार्ग बदलावे लागले आहेत.

पर्वतीय राज्यांमध्ये भूस्खलनाने रस्त्ये खचले आहेत. तर राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांतील रस्ते पाण्यात बुडाले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंजाब, हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांशी आणि दिल्ली, जम्मू-काश्मीरच्या नायब राज्यपालांशी बोलून परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे मंडी आणि कुलू येथे बियास नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली आहे. त्यात तीन पूल, एक एटीएम आणि चार दुकाने वाहून गेली. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत अतिवृष्टीसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधील अनेक भागात ट्रॅकवर पाणी साचल्याने अंबालाहून उना-अंब-दौलतपूर चौकाकडे येणाऱ्या वंदे भारतसह अन्य गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे.

हेही वाचा : 

Back to top button