‍BJP प्रवक्त्या रुचि पाठक म्हणतात, ९९ वर्षांच्या लीजवर मिळाले देशाला स्वातंत्र्य! - पुढारी

‍BJP प्रवक्त्या रुचि पाठक म्हणतात, ९९ वर्षांच्या लीजवर मिळाले देशाला स्वातंत्र्य!

झांशी : पुढारी ऑनलाईन

झांशीमधील एका मीडिया चर्चासत्रादरम्यान सहभागी झालेल्या भाजपच्या ‍(BJP) महिला प्रवक्त्या रुचि पाठक (Ruchi Pathak) सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहेत. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. देशाला ९९ वर्षाच्या लीजवर स्वातंत्र्य मिळाले, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. या चर्चेदरम्यान खासगीकरणाच्या मुद्यावर काँग्रेस प्रवक्त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यावर भाजपने उत्तर देत आपली भूमिका मांडली आणि नव्या वादाला तोंड फुटले.

भाजप (BJP) प्रवक्त्या रुचि पाठक यावेळी म्हणाल्या की, भारताला मिळालेले स्वातंत्र्य करार स्वरुपात आहे. काँग्रेसने देशाला ९९ वर्षांच्या लीजवर स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या आहेत. त्यांच्या या वक्तव्याच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

सोशल मीडियावर रुचि पाठक यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भाजप प्रवक्त्यांना काही लोकांनी व्हॉटस् अॅप युनिव्हर्सिटीची टॉपर असल्याचे म्हणत ट्रोल केले आहे. रुचि पाठक एका मीडियाच्या चर्चासत्रात सहभागी झाल्या होत्या. यावेळी काँग्रेस प्रवक्ते गौरव जैन यांनी खासगीकरणाच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. एअर इंडिया विकल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

प्रत्युत्तरादाखल भाजपच्या (BJP) वतीने रुचि पाठक यांनी भूमिका मांडली. यावेळी त्या म्हणाल्या की भारताचे स्वातंत्र्य करार स्वरुपात आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या लीजवर मिळवून दिले आहे. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालेले नाही. ब्रिटीश कायद्याची शपथ घेण्यात आली. निवडणूक तर नंतर झाली. त्यानंतर १९५१ मध्ये भारतात संविधान लागू झाले.

त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद झाल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण देताना पाठक यांनी, जे काही वक्तव्य केले ते त्या क्षणी दिलेले प्रत्युत्तर होते, असे म्हटले आहे. देशवासीयांच्या भावना दुखावण्याचा आणि संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा आमचा हेतू नव्हता. हे माझे वैयक्तिक वक्तव्य होते. ही पक्षाची भूमिका नाही. काही ब्लॉग आणि राजीव दीक्षित यांच्या वक्तव्याच्या आधारावर मी देशाच्या स्वातंत्र्याबाबत भाष्य केले होते, असे पाठक यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस प्रवक्ते गौरव जैन यांनी, भाजपचे बहुतांश प्रवक्ते व्हॉटस्‌ ॲप युनिव्हर्सिटीचे ज्ञान प्राप्त करत असल्याचे म्हटले आहे. त्यांना इतिहास आणि तथ्यांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा पाया खोटेपणांवर आधारित असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर : पट्टणकोडोली येथील भाकणूक | Pattankodoli yatra 2021 Special

Back to top button