Stock market | गुंतवणूकदार ६ महिन्यांत १४ लाख कोटींनी श्रीमंत, बाजारात तेजीची बरसात कशामुळे? | पुढारी

Stock market | गुंतवणूकदार ६ महिन्यांत १४ लाख कोटींनी श्रीमंत, बाजारात तेजीची बरसात कशामुळे?

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) काल (दि.३०) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. सेन्सेक्स ८०३ अंकांनी वाढून ६४,७१८ वर बंद झाला. तर निफ्टी २१६ अंकांच्या वाढीसह १९,१८९ वर स्थिरावला. मुख्यतः देशभरात सक्रिय झालेला मान्सून आणि परदेशी गुंतवणूकदारांची भारतीय बाजारात वाढलेली गुंतवणूक (foreign institutional investors) हे शेअर बाजारासाठी फायदेशीऱ घटक ठरले आहेत. यामुळे यंदा २०२३ च्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारातील गुंतवणूकदार १४.०७ लाख कोटी रुपयांनी श्रीमंत झाले आहेत. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३० जून २०२३ रोजी २९६.४६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी ३० डिसेंबर रोजी बाजार भांडवल २८२.३८ लाख कोटी रुपये होते. (Stock market)

परदेशी गुंतवणूकदारांनी ओतला पैसा

दरम्यान, शुक्रवारच्या उच्चांकी तेजीमुळे बीसीई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल एका दिवसात २.३६ लाख कोटींनी वाढले. दरम्यान, जूनमध्ये BSE वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२.३५ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची जानेवारी-जून २०२३ दरम्यानच्या कालावधीत भारतीय शेअर्समधील गुंतवणूक ६० हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. दुसरीकडे देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांची निव्वळ गुंतवणूक २८ जून २०२३ पर्यंत ८३,९६४ कोटी रुपये आहे.

दरम्यान, या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी २०,३६१ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. तर याच कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी (domestic institutional investors) १,५६४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. जून महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी २७,२५० कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ४,४५८ कोटी रुपयांचे शेअर्सची खरेदी केली.

निफ्टीत ६ टक्क्यांची वाढ

BSE सेन्सेक्स ३० जून २०२२ रोजी ६०,८४० वर होता. तो ३० जून २०२३ रोजी ६४,७१८ च्या विक्रमी उच्चांकावर जाऊन स्थिरावला. गेल्या ६ महिन्यांत सेन्सेक्स ३,८७८ अंकांनी म्हणजेच ६.३७ टक्क्यांनी वाढला आहे. तसेच ५० शेअर्सचा NSE निफ्टी निर्देशांक १९,१८९ अंकांवर गेला आहे. निफ्टीची गेल्या सहा महिन्यांतील वाढ ही ५.९९ टक्के एवढी आहे.

BSE क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये रियल्टी आणि कॅपिटल गुड्स निर्देशांक प्रत्येकी सुमारे २० टक्क्यांनी वाढले. ऑटो, एफएमसीजी, हेल्थकेअर आणि कंझ्युमर ड्युरेबल्स निर्देशांकही याच कालावधीत ७ ते २० टक्क्यांच्या दरम्यान वाढले आहेत.

टाटा मोटर्सचा शेअर्स टॉपवर

इक्विटी बेंचमार्कने जूनच्या शेवटच्या आठवड्यात ३.५ टक्केच्या वाढीसह अनेक विक्रम मोडले. परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ (FII) आणि देशभरात व्यापलेल्या मान्सूनमुळे गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. सेन्सेक्सवर वाढलेल्या शेअर्सच्या यादीत टाटा मोटर्स टॉपवर आहे. हा शेअर गेल्या काही दिवसांत ६ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. त्यानंतर सन फार्मा आणि एम अँड एम हे शेअर्सही वधारले आहेत. (Stock market)

 हे ही वाचा :

Back to top button