Stock Market Closing | सेन्सेक्सने तोडले सगळे रेकॉर्ड! बंपर तेजीमागे ‘हे’ घटक ठरले महत्त्वाचे | पुढारी

Stock Market Closing | सेन्सेक्सने तोडले सगळे रेकॉर्ड! बंपर तेजीमागे 'हे' घटक ठरले महत्त्वाचे

पुढारी ऑनलाईन : जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात वाढलेला ओघ हे घटक शेअर बाजाराच्या वाढीसाठी फायदेशीऱ ठरले. आज शुक्रवारी (दि. ३०) सेन्सेक्स आणि निफ्टीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८४१ अंकांनी वाढून ६४,७५७ वर तर निफ्टीने २२१ अंकांनी वाढून १९,१९३ वर व्यवहार केला. त्यानंतर सेन्सेक्स ८०३ अंकांनी वाढून ६४,७१८ वर बंद झाला. तर निफ्टी २१६ अंकांच्या वाढीसह १९,१८९ वर स्थिरावला. बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वधारले. (Stock Market Closing)

गेल्या तीन सत्रांत सेन्सेक्स जवळपास १,८०० अंकांनी वाढला आहे. आज त्याने ६४,७५० वर झेप घेतली. याआधीच्या सत्रात सेन्सेक्स ६३,९१५ वर बंद झाला होता. आज तो ६४,०६८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने आज ६४,७५० अंकांचा आकडा पार करत नवा उच्चांक नोंदवला. या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये प्रत्येकी ३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारातील आजच्या तेजीत आयटी, ऑटो शेअर्स आघाडीवर राहिले. (Stock Market Updates) रियल्टी स्टॉक्समध्ये अॅक्शन दिसून आली.

बाजारातील तेजीचे कारण

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आहेत. तसेच आजच्या ट्रेडिंग सत्रात हेविवेट शेअर्समध्ये जोरदार खरेदी राहिली. डॉलरच्या तुलनेत आज रुपया मजबूत दिसून आला. बुधवारी बंद झालेल्या ८२.०५ च्या तुलनेत भारतीय रुपया शुक्रवारी प्रति डॉलर ८२.०४ वर बंद झाला. त्यात मान्सूनची वेगाने प्रगती आणि आरबीआयची व्याजदर स्थिर ठेवण्याची भूमिका बाजाराच्या तेजीसाठी पोषक ठरली आहे. तसेच बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ वाढला आहे. (Stock Market Updates)

बाजार भांडवल २९५.७२ लाख कोटींवर

दरम्यान, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात २९५.७२ लाख कोटींच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. यापूर्वी २१ जून रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २,९४,३६,५९४ कोटी रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले होते. आज बाजार भांडवल (mcap) २,९५,७२,३३८ कोटी रुपयांवर पोहोचले.

सेन्सेक्सवर एम अँड एम, इंडसइंड बँक, सन फार्मा, इन्फोसिस, टीसीएस, मारुती, टाटा मोटर्स, विप्रो, टेक महिंद्रा, एचडीएफसी बँक, विप्रो, एलटी, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, एचडीएफसी, एचसीएल टेक, रिलायन्स हे शेअर्स वधारले आहेत. तर केवळ एनटीपीसी, आयसीआयसीआय हे शेअर्स घसरले. M&M चा शेअर हा सर्वाधिक वाढला. हा शेअर ४.२० टक्के वाढून १,४५३ रुपयांवर पोहोचला. तर अदानी पोर्ट्सचा शेअर २.२८ टक्क्यांनी घसरला.

IT stocks वधारले

अमेरिकेतील अर्थव्यवस्था सावरत असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. यामुळे मंदीची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर आयटी स्टॉक्स आज वधारले. इन्फोसिसचा शेअर २.८ टक्के वाढला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस २.४ टक्के, LTIMindtree २.३ टक्के, विप्रो १.३ टक्के, टेक महिंद्रा १.८ टक्के, एचसीएल टेक्नॉलॉजीज १.१ टक्के आणि बीएसई आयटी निर्देशांक २ टक्के वाढला.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

आयटी निर्देशांक २.५ टक्के आणि PSU बँक निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला. एकूणच सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी हिरव्या चिन्हात व्यवहार केला. ऑटो, कॅपिटल गुड्स निर्देशांक प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. बँक निफ्टीने ४४,६०० च्या वर झेप घेतली. कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म सेवा पुरवठादार कलेरा १०० दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर बीएसईवरील शुक्रवारच्या व्यवहारात टाटा कम्युनिकेशन्सचे शेअर्स (Shares of Tata Communications) ४ टक्के घसरून १,५१६ रुपयांवर आले. तर स्टॉकमधील संभाव्य ब्लॉक डीलमुळे शुक्रवारी NSE वर अदानी ट्रान्समिशनचे शेअर सुमारे ४ टक्के घसरले.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. जपानचा निक्केई घसरला आहे. चीनचा शांघाय कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग वाढला आहे.

गुंतवणूकदारांकडून खरेदीचा ओघ

NSE डेटानुसार, बुधवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) १२,३५० कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली, तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,०२१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्षात परदेशी गुंतवणुकदारांची भारतीय इक्विटीमधील गुंतवणूक १० अब्ज डॉलरवर गेली आहे. (Stock Market Closing)

 हे ही वाचा :

Back to top button