PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना; दौऱ्यात होणार संरक्षणाचे करार | पुढारी

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना; दौऱ्यात होणार संरक्षणाचे करार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२०) अमेरिकेच्या दौऱ्यासाठी दिल्लीहून रवाना झाले. ते न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय त्यांचे अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहात भाषण होणार आहे. त्यांच्या हा दौरा सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. अमेरिका दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत दोन देशांत अनेक महत्त्वपूर्ण आणि संरक्षणविषयक करार होण्याची शक्यता आहे. त्यात जेट इंजिन निर्मितीपासून ड्रोन खरेदीपर्यंतच्या करारांचा समावेश आहे.

पंतप्रधानांच्या सन्मानार्थ शाही मेजवानीचे आयोजन करण्यात आले असून अमेरिकेतील भारतीयांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विनयमोहन क्वात्रा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यातून दोन देशांतील संरक्षण उद्योगातील सहकार्याचा रोडमॅप निश्चित केला जाईल. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या चर्चेत संरक्षण उत्पादनातील सहउत्पादन आणि सहविकास या दोन बाबींवर सखोल चर्चा होणार आहे. त्यातून संरक्षण उद्योगाला बळ मिळणार आहे. तसेच मजबूत व्यापार आणि गुंतवणूक सहभागिता हा विषय दोन नेत्यांच्या चर्चेत असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी होऊन योगाभ्यासातही सहभागी होणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button