मोदींवर टीका करताना मर्यादेत रहा; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा | पुढारी

मोदींवर टीका करताना मर्यादेत रहा; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना इशारा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आम्ही युती केली आहे. त्यामुळे मोदी, शहा यांच्यावर टीका करताना आपल्या मर्यादेत रहा आणि आपली कुवत सांभाळा, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. त्याचबरोबर लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपसोबत लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी गोरेगाव येथील नेस्को संकुलात शिवसेनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. फूट पडल्यानंतर हा पहिलाच वर्धापन दिन होता. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शिवसेनेचा खरा वारसा हा आपल्याकडे असल्याचे ठासून सांगितले. आपण गद्दारी केली नाही. उद्धव ठाकरे यांनी खुर्ची आणि मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचे विचार आणि पक्ष वाचवण्यासाठी आपण उठाव केला. जर हा उठाव आणि क्रांती नसती तर शिवसेनेचे 40 आमदार आणि 13 खासदार आपल्यासोबत आलेच नसते. त्यामुळे खरी शिवसेना ही आपलीच आहे. त्यावर पक्ष आणि चिन्ह देऊन निवडणूक आयोगानेही शिक्कामोर्तब केले आहे आणि सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केले आहे, असा दावा शिंदे यांनी केला.

रविवारी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिबिरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरला जाण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान दिले होते. त्यावर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत त्यांना गर्भित इशाराही दिला.

ते म्हणाले, मणिपूर काय मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला आहे. तुम्ही वर्षावरून मंत्रालयात कधी जाऊन दाखवले नाही, एक नोटीस आली, तेव्हा तुमची पातळ झाली होती. त्यामुळे आपल्या मर्यादेत राहा, ते जोपर्यंत बघत नाहीत तोपर्यंत ठीक आहे. नोटिशीनंतर मोदींना भेटण्यासाठी गेलात. शिष्टमंडळ बाहेर ठेवले आणि आतमध्ये शिष्टाई केली. हे सर्व आम्हाला सर्व माहिती आहे, असे शिंदे म्हणाले.

गद्दार नाही स्वाभिमान दिवस

अयोध्येत राम मंदिर व्हावे, कश्मीरमधील 370 कलम रद्द व्हावे, हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. हे स्वप्न मोदी-शहा यांनी साकार करून दाखवले. आम्ही बाळासाहेबांचे स्वप्न साकार करणार्‍यांसोबत आहोत, असे सांगून तुम्ही कोणासोबत आहात याचा विचार करा. ज्या श्रीनगरच्या लाल चौकात भारताचा तिरंगा फडकत नव्हता. तेथे आज डौलाने तिरंगा फडकत आहे. याच चौकात एकनाथ शिंदे याचेही बॅनर झळकले, असे सांगून 20 जून हा गद्दार दिवस नाहीतर स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन शिंदेंनी शिवसैनिकांना केले. वाघ मैदानात येत नाही तोपर्यंतच कोल्हेकुई चालते. तो मैदानात आला की कोल्हेकुई बंद होते. तुमची ही कोल्हेकुई लवकरच बंद होईल.

उद्धव ठाकरे पेनच ठेवत नव्हते!

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अडीच वर्षात फक्त दोन वेळा मंत्रालयात आले. राज्यात काय चालले याची माहिती मुख्यमंत्र्यांना हवी. पण ती घेण्यात सुद्धा ते अपयशी ठरले, अशी टीका खुद्द शरद पवार यांनीच त्यांच्या पुस्तकात केली. उद्धव ठाकरे खिशाला पेन ठेवत नव्हते. सह्याच करायचे नाहीत. पण माझ्या खिशाला दोन दोन पेन आहेत. जेथे असेन तेथे मी सह्या करतो आणि निर्णय घेतो. त्यांनी अडीच वर्षात केल्या नसतील तेवढ्या सह्या मी रोज करतो, असा टोला लगावत शिंदे म्हणाले, कोरोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक माणसे मृत्युमुखी पडली त्यावेळी तुम्ही पैसे बनवत होतात. याचा हिशोब एक न् एक दिवस तुम्हाला द्यावा लागेल.

Back to top button