Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती फडणवीसांनाच | पुढारी

Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती फडणवीसांनाच

मुंबई; वृत्तसंस्था : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीबाबत न्यूज अरेना संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 123 ते 129 जागा जिंकून भाजपच पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहणार असून मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के पसंती मिळून ते पहिल्या क्रमांकावर आहेत. अशोक चव्हाण दुसर्‍या क्रमांकावर आहेत तर त्या खालोखाल अनुक्रमे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना पसंती मिळाली आहे. ( Devendra Fadnavis)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा अचूक अंदाज वर्तवणार्‍या न्यूज अरेना या संस्थेने नुकतेच महाराष्ट्राचे सर्वेक्षण केले व त्याचे निष्कर्ष ट्विटर हँडलवरून जाहीर केले. त्यानुसार विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती मिळाली असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौथ्या स्थानावर आहेत तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेवटच्या म्हणजे पाचव्या स्थानावर आहेत. ( Devendra Fadnavis)

मुख्यमंत्रिपदासाठी कोणाला पसंती

न्यूज अरेनाच्या या सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री म्हणून सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना 21 टक्के, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना 14 टक्के, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 12 टक्के तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवघ्या 9 टक्के मतदारांची पसंती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या सर्व विभागांत भाजपची ताकद

या सर्वेक्षणात विभागनिहायही आकडेवारी देण्यात आली असून त्यात भाजप सर्वच विभागांत आघाडीवर आहे. या सर्वेक्षणानुसार भाजप राज्यात नंबर वन पक्ष राहणार असला तरी शिवसेना आणि ठाकरे गट यांच्याही आकडेवारी आश्चर्यकारक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळतील, फक्त कोकणातच नाही तर सर्व महाराष्ट्रातून त्यांचे आमदार निवडून येतील, असा निष्कर्षही न्यूज अरेना इंडियाच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. ( Devendra Fadnavis)

कोकण (39 जागा) : भाजप 29 ते 33, शिवसेना 11, ठाकरे गट 14 ते 16, काँग्रेस 5 ते 6, राष्ट्रवादी 7 ते 8 आणि इतर पक्ष 5 जागा.
मुंबई (36 जागा) : भाजप 16 ते 18, शिवसेना 2, ठाकरे गट 9 ते 10, काँग्रेस 5 ते 6, राष्ट्रवादी 1 आणि इतर पक्ष 1 जागा.
पुणे आणि पश्चिम विभाग (58 जागा) : भाजप 22 ते 23, शिवसेना 1, ठाकरे गट 1, काँग्रेस 9 ते 10 जागा, राष्ट्रवादी 23 जागा.
मराठवाडा (46 जागा) : भाजप 19, शिवसेना 5, ठाकरे गट 2, काँग्रेस 10 जागा आणि राष्ट्रवादी 9 जागा.
उत्तर महाराष्ट्र (47 जागा) : भाजप 23, शिवसेना 3, ठाकरे गट शून्य, काँग्रेस 6 आणि राष्ट्रवादी 14 जागा.
विदर्भ (62 जागा) : भाजपला 30 ते 31, शिवसेना 5, ठाकरे गट शून्य, काँग्रेसला 20 ते 21 आणि राष्ट्रवादी 2, तर इतर पक्षांना 4 जागा.

 

   हेही वाचलंत का ? 

 

Back to top button