Cyclone ‘Biparjoy’: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळला, लाटांचे थैमान; उद्या जखाऊ बंदर ओलांडणार | पुढारी

Cyclone 'Biparjoy': 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे समुद्र खवळला, लाटांचे थैमान; उद्या जखाऊ बंदर ओलांडणार

पुढारी ऑनलाईन : ईशान्य अरबी समुद्रावरील अतिशय तीव्र चक्रीवादळ “बिपरजॉय” हे ६ तासात ३ किमी प्रतितास वेगाने उत्तरेकडे  सरकत आहे. बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीला समांतर पाकिस्तानच्या कराची शहराकडे सरकत आहे. दरम्यान अरबी समुद्र खवळला असून, मोठ्या आणि तीव्र लाटा निर्माण होत आहेत. गुजरातसह मुंबईमधील किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह समुद्र खवळल्याने लाटांची तीव्रता देखील अधिक आहे. समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात लाटा उसळताना दिसत आहेत, याचा व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

पाहा व्हिडिओ: ‘बिपरजॉय’ वादळामुळे मुंबईतील मरीन ड्राईव्हवर लाटांचे थैमान

‘बिपरजॉय’ची जखाऊ पोर्टच्या दिशेने वाटचाल

सध्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने काही प्रमाणात सौराष्ट्र आणि कच्छची किनारपट्टी ओलांडली आहे. तर पाकिस्तानच्या किनारपट्टीलगत मांडवी (गुज) आणि कराचीजवळ हे चक्रीवादळ सध्या घोंघावत आहे. १५ जूनच्या सायंकाळी बिपरजॉय चक्रीवादळ जखाऊ पोर्ट किनारपट्टीला ओलांडणार आहे. या दरम्यान बिपरजॉय अतिशय तीव्र होणार आहे. दरम्यान या भागात १२५-१३५ ते १५० ताशी किमी वेगाने वारे वाहणार असून, जखाऊ पोर्टच्या किनारपट्टीला ‘बिपरजॉय’ प्रभावित करण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. खबरदारीसाठी जखाऊ पोर्टवर सध्या मासेमारी बंद ठेवण्यात आली असून जखाऊ पोर्टवर बोटी उभ्या करून ठेवल्या आहेत.

‘बिपरजॉय’ हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या जखाऊ बंदराच्या नैऋत्येस सुमारे २८० किमी, देवभूमी द्वारकाच्या पश्चिम-नैऋत्येस २९० किमी, नलियाच्या पश्चिम-नैऋत्येस ३०० किमी, पोरबंदरच्या नैऋत्येस ३४० किमी आणि कराची (पाकिस्तानच्या) दक्षिण-नैऋत्येस ३४० किमी अंतरावर ईशान्य अरबी समुद्रावर घोंघावत आहे, असे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

Cyclone ‘Biparjoy’: गुजरातमध्ये मोठे नुकसान, तज्ज्ञांची भिती

भारतीय हवामान खात्याने (IMD) अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉयच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या किनारी भागात अलर्ट जारी केला आहे. कच्छ, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जामनगर आणि मोरबी या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. बिपरजॉयची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली तरी ते पुन्हा वेग घेऊ शकते आणि यामुळे गुजरातमध्ये मोठे नुकसान होऊ शकते, अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Cyclone Biparjoy)

हेही वाचा:

Back to top button