Mann Ki Baat : लसीकरणाचे यश भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन : PM नरेंद्र मोदी - पुढारी

Mann Ki Baat : लसीकरणाचे यश भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन : PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Mann Ki Baat : कोरोना वितोधातील लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार पडल्यानंतर देश एक नवा उत्साह, नव्या ऊर्जेसह मार्गक्रमण करीत आहे. लसीकरण अभियानाला लाभलेले यश भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन करीत आहे. सर्वांच्या प्रयत्नांच्या मंत्रीशक्तीचे प्रत्यंतर दाखवत आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’कार्यक्रमातून ( Mann Ki Baat ) देशवासियांना संबोधित करतांना व्यक्त केली.

पुढे बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, आरोग्य कर्मचारी देशवासियांच्या लसीकरणात कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाहीत, असा विश्वास अगोदर पासूनच होता.आरोग्य कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम, निर्धाराने एक नवीन उदाहरण समोर ठेवले.आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाविन्यपूर्णतेसह आपल्या दृढ निश्चयानने मानवतेच्या सेवेचा एक नवीन निकष स्थापित केला. सर्व आव्हानांना पार करून जास्तीत जास्त लोकांना सुरक्षा कवच प्रदान केले, अशा शब्दात कोरोना महारोगराई दरम्यान आरोग्य कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या सेवाकार्याला सलाम करीत काही आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.

३१ ऑक्टोबर ला देश सरदार पटेल यांची जयंती साजरी करेल. ‘राष्ट्रीय एकता दिन’ म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. यनिमित्त ऐकतेचा संदेश देणाऱ्या उपक्रमासोबत जुडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. सरदार पटेल यांच्या जीवनातून,विचारांपासून खूप काही शिकू शकतो. देशाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सरदार पटेल यांच्या जीवनावर तयार केलेले चित्रमय चरित्र सर्व युवामित्रांनी जरूर वाचावे.

अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तिपर गीतांची स्पर्धा ( Mann Ki Baat )

स्वातंत्र्याच्या लढाईत वेगवेगळ्या भाषा, बोलीमधल्या देशभक्ति गीतांनी आणि भजनांनी पूर्ण देशाला एकत्र आणले होते. आता अमृतकाळात युवक देशभक्तिवरील अशीच गीतं लिहून त्यांचे आयोजन करून उर्जा निर्माण करू शकतात. देशभक्तिची ही गीते मातृभाषेत असू शकतील, राष्ट्रभाषेत असू शकतील किंवा इंग्रजीतही लिहू शकतात. परंतु या रचना नव्या भारताचा विचार असणारी, देशाच्या वर्तमानातील यशापासून प्रेरणा घेऊन भविष्यासाठी देशाला संकल्पित करणारी असली पाहिजेत, हे आवश्यक आहे. सांस्कृतिक मंत्रालयाने तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अशी स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.अमृतकाळात अंगाईगीत कला पुनर्जिवित करून देशभक्तिशी जोडलेली अशी अंगाईगीते,कविता, गीते लिहून माता अत्यंत सहजतेने आपल्या लहान लहान मुलांना ऐकवू शकतील. या अंगाईगीतांमध्ये आधुनिक भारताचा संदर्भ असेल, २१ व्या शतकातल्या भारताच्या स्वप्नांचे दर्शन घडेल.मंत्रालयाने याच्याशी जोडलेली स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑक्टोबर ला सरदार पटेलांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धा घेण्यास सुरुवात केली जाईल.

‘धरती आबा’चे स्मरण ( Mann Ki Baat )

अमृत महोत्सवात देशाचे वीर पुत्र आणि कन्यांच्या महान पुण्यात्म्यांचे स्मरण करीत आहोत.पुढल्या महिन्यात १५ नोव्हेंबरला देशाचे महापुरूष,वीर योद्धा भगवान बिरसा मुंडाजी यांची जयंती आहे. भगवान बिरसा मुंडा यांना धरती आबा असे म्हटले जाते. धरती पिता असा त्याचा अर्थ आहे.भगवान बिरसा मुंडा यांनी ज्या प्रकारे आपली संस्कृती,आपले जंगल, आपल्या जमिनीच्या संरक्षणासाठी संघर्ष केला, तसा तो धरती आबाच करू शकत होते. त्यांनी आपल्याला आपली संस्कृती आणि मूळांबद्दल अभिमान बाळगायला शिकवले. परदेशी राजसत्तेने किती त्यांना धमक्या दिल्या, किती दबाव टाकला,परंतु, त्यांनी आदिवासी संस्कृती सोडली नाही. निसर्ग आणि पर्यावरणावर जर आम्हाला प्रेम करायला शिकायचे असेल तर धरती आबा,भगवान बिरसा मुंडा आमची खूप मोठी प्रेरणा आहे.

परकीय सरकारच्या ज्या गोष्टींमुळे पर्यावरणाला नुकसान पोहोचणार आहे, अशा प्रत्येक धोरणाला त्यांनी अगदी कडाडून विरोध केला. गरीब आणि अडचणी-समस्या यांच्या चक्रात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा नेहमीच आघाडीवर असायचे. त्यांनी सामाजिक कुरीती संपुष्टात आणण्यासाठी समाजाला जागृत करण्याचे काम केले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेले उलगुलान आंदोलनाने इंग्रजांना हलवून टाकले होते.युवकांनी बीरसा मुंडा यांच्याविषयी वाचन करून त्यांच्या कार्याची माहिती आणखी जाणून घ्यावी. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या आदिवासी समूहाने दिलेल्या वैशिष्टपूर्ण योगदानाविषयी जितकी माहिती घ्याल, तितक्याच प्रमाणात त्यांचे कार्य गौरवपूर्ण असल्याची अनुभूती होईल, असे ते म्हणाले.

मातृशक्तीला वंदन!

सेना-लष्कर आणि पोलिस यासारख्या सेवा केवळ पुरूषांसाठीच असतात.परंतु, ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या आकडेवारी नुसार गेल्या काही वर्षांमध्ये महिला पोलिस कर्मचारी वर्गाची संख्या दुप्पट झाली आहे.२०१४ मध्ये महिला पोलिसांची संख्या १ लाख ५ हजारच्या जवळपास होती. तर २०२० पर्यंत ही संख्या वाढून ती दुपटीपेक्षा जास्त २ लाख १५ हजारापर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये गेल्या सात वर्षांमध्ये महिलांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. काही मुली देशाच्या कन्या अवघडात अवघड कामही संपूर्ण ताकदीनिशी, मोठ्या धाडसाने करीत आहे. काही मुली कठिण असे मानले जाणारे प्रशिक्षण म्हणजे ‘स्पेशलाईज्ड जंगल वॉरफेअर कमांडोज’चे प्रशिक्षणही घेत आहेत. या प्रशिक्षणार्थी आपल्या ‘कोब्रा बटालियन’ चा हिस्सा बनणार आहेत. विमानतळ, मेट्रो स्थानकावर,सरकारी कार्यालयात सीआयएसएफच्या बहादूर महिला प्रत्येक संवेदनशील स्थानांवर सुरक्षा व्यवस्था पहात असताना दिसतात. याचा सर्वात सकारात्मक परिणाम आपल्या पोलिस दलाबरोबरच समाजाच्या मानसिकतेवरही पडत आहे. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे लोकांमध्ये विशेषतः महिलांना एकप्रकारची सहजता वाटते, विश्वास निर्माण होतो. त्यांना स्वाभाविकपणे त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो, स्वतःला त्यांच्याबरोबर जोडतात. महिलांमध्ये असलेल्या संवेदनशीलतेमुळेही लोकांना त्यांच्याविषयी जास्त भरवसा वाटतो. आपल्या या महिला पोलिस कर्मचारी देशातल्या इतर लाखो मुलींसाठी ‘रोल मॉडेल’ बनत आहेत.शाळा सुरू झाल्या की, त्यांनी आपल्या भागातल्या शाळांना भेटी द्याव्यात आणि तिथल्या मुलींबरोबर संवाद साधावा.असा संवाद साधल्यामुळे आपल्या नवीन पिढीला एक वेगळी नवी दिशा मिळेल. इतकेच नाही तर यामुळे पोलिसांवर जनतेचा विश्वासही वाढेल. आगामी काळात आणखी जास्त संख्येने महिला पोलिस सेवेत सहभागी होतील आणि आपल्या देशाच्या ‘न्य एज पोलिसिंग’चे नेतृत्व करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

नवीन ड्रोन धोरणामुळे विदेशी गुंतवणूक

१५ ऑगस्टला देशाने एक नवीन ड्रोन धोरण जाहीर केलले आहे. ड्रोनशी संबंधित वर्तमान आणि भविष्यातल्या अनेक शक्यतांचा हिशेब लक्षात घेऊन हे धोरण निश्चित केले आहे.नवीन ड्रोन धोरण आल्यानंतर अनेक ड्रोन स्टार्ट अप्समध्ये विदेशी आणि देशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. अनेक कंपन्या ड्रोन निर्मितीचे प्रकल्पही उभे करीत आहेत. लष्कर, नौदल, वायूदलाने भारतीय ड्रोन कंपन्यांना ५०० कोटी रूपयांपेक्षा जास्त मागणी नोंदवली आहे.ड्रोन तंत्रज्ञानामध्ये देशाला अग्रणी बनवायचे आहे. म्हणूनच सरकार आवश्यक असणारी सर्व पावले उचलत आहे. देशातील युवकांनी ड्रोन धोरणानंतर निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

सणासुदीला ‘व्होकल फॉर लोकल’ लक्षात ठेवण्याचे आवाहन

ऑक्टोबरचा पूर्ण महिना सणांच्या रंगात रंगला आहे आणि आता काही दिवसांनी दिवाळी तर येतच आहे. दिवाळी, त्यानंतर गोवर्धन पूजा, नंतर भाऊबीज, हे तीन सण तर होतीलच, पण याच दरम्यान छटपूजाही होईल. नोव्हेंबरमध्येच गुरू नानकदेवजी यांची जयंतीही आहे. इतके सण एकाच वेळेस होत असतात तर त्यांची तयारीही खूप अगोदरपासून सुरू होते. दरम्यान बजारातून खरेदी करताना व्होकल फॉर लोकल हे लक्षात असू द्या, असे पंतप्रधान म्हणाले. लोकल वस्तु खरेदी केली तर आपला सण उजळून निघेल आणि एखादा गरीब भाऊ बहिण, एखादा कारागीर, एखाद्या विणकराच्या घरातही प्रकाश येईल. ही मोहीम सणासुदीच्या काळात आणखी मजबूत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button