Aryan Khan case : आर्यन खानसह अन्‍य आरोपींच्‍या बँक खात्‍यांची होणार चौकशी - पुढारी

Aryan Khan case : आर्यन खानसह अन्‍य आरोपींच्‍या बँक खात्‍यांची होणार चौकशी

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई क्रूज ड्रग्‍ज प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान (Aryan Khan case : ) याच्‍यासह अन्‍य संशयित आरोपींच्‍या बँक खात्‍यांची नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरोकडून (एनसीबी) चौकशी करण्‍यात येत आहे. यामुळे याप्रकरणातील सर्वच आरोपींच्‍या अडचणीमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे. यापूर्वीच आर्यनच्‍या व्‍हॉटस ॲप चॅटची सखोल चौकशी ‘एनसीबी’ने केली आहे.

ड्रग्‍ज प्रकरणी अटकेत असलेल्‍या सर्वच आरोपींच्‍या बँक व्‍यवहारांची चौकशी करण्‍यात येत आहे. ड्रग्‍ज खरेदी व्‍यवहारामध्‍ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्‍यवहार झाले आहेत का, याची तपासणी ‘एनसीबी’कडून सुरु आहे.
आर्यन खानच्‍या जामीन अर्जावर २६ ऑक्‍टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

 ठोस पुरावे गोळा करण्‍यासाठी ‘एनसीबी’ने कंबर कसली

याप्रकरणी ‘एनसीबी’ने सर्वच आरोपींच्‍या जामिनास विरोध केला आहे. यासंदर्भात माहिती देताना ‘एनसीबी’च्‍या एका अधिकार्‍याने सांगितले की, याप्रकरणातील आरोपींच्‍या आर्थिक व्‍यवहारांची माहिती आम्‍ही घेतली आहे. यामध्‍ये मोठ्या आर्थिक व्‍यवहारांची माहिती उघड झाली आहे. याची सखोल चौकशी करुन ठोस पुरावे मिळाल्‍यास ड्रग्‍ज आर्थिक व्‍यवहारप्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा होवू शकते, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

(Aryan Khan case : ) डिलीट केलेल्‍या व्‍हॉटस ॲप चॅटचा शोध

तपास पथक सध्‍या संशयित आरोपींच्‍या मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अन्‍य इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटवरुन डिलीट केलेल्‍या व्‍हॉटस ॲप चॅटचा शोध घेत आहे. तसेच ड्रग्‍जच्‍या खरेदी-विक्री व्‍यवहारात सोशल मीडियाचा कसा वापर करण्‍यात आला, याचाही तपास केला जात आहे.

आर्यन खानच्‍या जामीन सुनावणीवेळी ‘एनसीबी’ने त्‍याचे व्‍हॉटस ॲप चॅट ( Aryan Khan WhatsApp chats ) न्‍यायालयात सादर केले होते. याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री अनन्‍या पांडे हिची चौकशी करण्‍यात आली आहे. या चौकशीवेळी आर्यन याने अनन्‍याकडे गांजाची मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. एक रिपोर्टनुसार, हे व्‍हॉटस ॲप चॅटिंग २०१८-१९मधील आहे. मात्र मी आर्यनची चेष्‍टा करत होते, असा दावा अनन्‍याने चौकशीवेळी केला आहे.  हे चॅटिंग ड्रग्‍ज संदर्भातील होते, याचीही माहिती नसल्‍याचे तिने म्‍हटले आहे. व्‍हॉटस ॲप चॅटिंगचा एनसीबीने चुकीचा अर्थ लावला आहे, असा युक्‍तिवाद आर्यन खानच्‍या वकिलांनी केला आहे. ‘एनसीबी’ने यापूर्वीच न्‍यायालयात आर्यन खान हा नियमित ड्रग्‍जचे सेवन करत होता, असे स्‍पष्‍ट केले आहे.

२ ऑक्‍टोबर रोजी मुंबईतील एक क्रुझवरील रेव्‍ह पार्टींवर एनसीबीने छापा टाकला होता. यावेळी आर्यन खान, अरबाज मर्चेंटसह सहा जणांना ताब्‍यात घेण्‍यात आले होते. यानंतर याप्रकरणी आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्‍यात आली.न्‍यायालयांनी सर्व संशयित आरोपींना न्‍यायालयीन कोठडी सुनावल्‍यानंतर सर्वांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्‍यात आली होती.

हेही वाचलं का?

 

 

 

Back to top button