आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करावा : संजय राऊत  - पुढारी

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी हस्तक्षेप करावा : संजय राऊत 

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बाॅलिवुड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरण आता वेगळं वळण घेत आहे. पंच प्रभाकर साईलने या प्रकरणात केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, “पोलिसांनी या प्रकरणात स्वतः हस्तक्षेप करायला हवा. कारण, या आरोपांमध्ये सांगितलं जात आहे की, कोऱ्या कागदावर ‘एनसीबी’ने स्वाक्षरी घेतलेल्या आहेत.”

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार के. पी. गोसावीचा आर्यन खानशी संवाद होतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री यांच्या ‘ड्रग्जच्या प्रकरणातून राज्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, या विधानाल दुजोरा दिला आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आर्यन खानच्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर ट्विट केलं आहे की, “सत्य ही जितेगा, सत्यमेव जयते.”

मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानच्या विरोधातील प्रकरणात पंच झालेल्या प्रभाकर साईलने समीर वानखेडे आणि  के. पी. गोसावी यांच्यावर धक्कादायक आरोप केलेले आहेत. आरोप करणारा प्रभाकर साईल हा गोसावीचा बाॅडीगार्ड आहे.

प्रभाकरने आरोप करताना सांगितले की, “के. पी. गोसावी आणि सॅम यांच्यातील २५ करोड रुपयांसंदर्भातील संवाद ऐकला होता. त्यात २५ करोडवरून १८ करोडवर डील फिक्स झालेली आहे, असंही त्यांने ऐकले होते. इतकंच नाही तर गोसावी आणि सॅम यांच्यातील संवादात ८ करोड रुपये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना द्यायचे आहेत, असंही प्रभाकर साईलने ऐकले होते.

प्रभाकरने असंही सांगितलं आहे की, “क्रूझवर छापेमारी केल्यानंतर शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानीबरोबर के. पी. गोसावी आणि सॅम यांची निळ्या रंगाच्या मर्सिडिस कारमध्ये जवळजवळ १५ मिनिटं संवाद झालेला मी पाहिलेला आहे. यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच होण्यासाठी सांगितले. एनसीबीने माझ्याकडून १० कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतल्या. इतकंच नाही तर ५० लाखांची कॅश असलेल्या दोन बॅग्ज गोसावीला देण्यात आल्या, “असंही प्रभाकर साईलेने सांगितलं आहे.

Back to top button