BBC कडून मोठा खुलासा, भारतात कमी कर भरला! | पुढारी

BBC कडून मोठा खुलासा, भारतात कमी कर भरला!

पुढारी ऑनलाईन : भारतात त्यांच्या दायित्वापेक्षा कमी कर भरत असल्याचे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात बीबीसीने (British Broadcasting Corporation) मंगळवारी मान्य केले. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे. BBC च्या मुंबई-दिल्ली कार्यालयातील आयटी सर्वेक्षणाबाबत आयकर विभागाने मोठा दावा केला होता. आयकर विभागाने सांगितले होते की, तीन दिवसांच्या सर्वेक्षणानंतर बीबीसी कार्यालयांमध्ये आंतरराष्ट्रीय कराच्या बाबतीत काही अनियमितता आढळून आल्या आहेत. आयकर विभागाने दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयात आयकर कायदा १३३A अंतर्गत सर्वेक्षण केले होते.

बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ डॉक्यमेंट्री बनवली होती. त्यानंतर केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारी बीबीसीची डॉक्यूमेंट्री शेअर करणाऱ्या ट्विटला ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लगेच बीबीसी कार्यालयाचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

बीबीसीचे नाव न घेता आयकर विभागाने १७ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली आणि मुंबईतील बीबीसी कार्यालयांवरील सर्वे ऑपरेशन्सबाबत एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात आयकर विभागाने म्हटले होते आहे की ऑपरेशन दरम्यान पुरावे गोळा केले गेले होते ज्यातून असे दिसून येते की बीबीसी समूहाच्या संस्थांकडून दाखवण्यात आलेले उत्पन्न आणि नफा त्यांच्या भारतातील कामकाजाच्या प्रमाणाशी सुसंगत नाही. तसेच बीबीसीने कर भरला नसल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत असल्याचे बीबीसीने त्यावेळी सांगितले होते.

दिल्ली आणि मुंबईतील BBC कार्यालयात आयकर अधिकाऱ्यांनी ‘सर्वेक्षण’ केल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्रावर जोरदार निशाणा साधला होता. सरकार बीबीसीच्या मागे लागली असल्याची टीका विरोधकांनी केली होती.

हे ही वाचा :

Back to top button