Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील १०१ मृतांची ओळख पटेना! | पुढारी

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील १०१ मृतांची ओळख पटेना!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ओडिशाच्या बालासोरनजीकच्या बहानग बजार येथे घडला. स्थानकावर थांबलेली मालगाडी, बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या तीन गाड्यांचा हा अपघात घडल्याची ही घटना दुर्मीळ समजली जात आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या १०१ मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटलेली नाही. तर ५५ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

शुक्रवारची सायंकाळ ओडिशातून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांसाठी जणू काळ बनून आली. बालासोर येथील बहानग बजार रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या महाभीषण दुर्घटनेत ३०० प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे गाड्यांच्या आघाताची तीव्रता एवढी होती की, कित्येक प्रवाशांचे मृतदेह डब्यांच्या खिडक्या फोडून बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत एक हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले. ही या शतकातील सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. बालासोर, कटक आणि आसपासच्या शहरांतील रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, अजूनही १०१ मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.

पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय म्हणाले की, सुमारे २०० लोक अजूनही ओडिशातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. “अपघातात सुमारे 1,100 लोक जखमी झाले होते, त्यापैकी सुमारे 900 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर सुमारे 200 जणांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 278 जणांपैकी १०१ मृतांची ओळख पटलेली नाही, असेही रॉय यांनी सांगितले.

भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृत कुलंगे यांनी सांगितले की, “भुवनेश्वरमध्ये ठेवण्यात आलेल्या एकूण १९३ मृतदेहांपैकी ८० मृतदेहांची ओळख पटली आहे. ५५ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.”

हेही वाचा : 

Back to top button