UP Mafia Don Mukhtar Ansari | अवधेश राय हत्याप्रकरणी गँगस्टर मुख्तार अन्सारी दोषी | पुढारी

UP Mafia Don Mukhtar Ansari | अवधेश राय हत्याप्रकरणी गँगस्टर मुख्तार अन्सारी दोषी

पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील बहुचर्चित ३२ वर्षापूर्वीच्या अवधेश राय हत्याप्रकरणी गँगस्टर मुख्तार अन्सारी याला वाराणसी एमपी/एमएलए न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ३ ऑगस्ट १९९१ रोजी काँग्रेस नेते आणि माजी आमदार अजय राय यांचे भाऊ अवधेश राय यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुख्तार अन्सारी हा या प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. या प्रकरणी सोमवारी दुपारी २ वाजता न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आवारात आणि शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त कडेकोट करण्यात आला आहे. (UP Mafia Don Mukhtar Ansari)

१७ मे रोजी गाझीपूरच्या एमपी/एमएलए न्यायालयाने उत्तर प्रदेशातील मोहम्मदाबाद येथील एका खुनाच्या प्रयत्नाच्या कटाच्या खटल्यातील आरोपी मुख्तार अन्सारीची निर्दोष मुक्तता केली होती. २००९ मध्ये मीर हसन यांनी अन्सारी विरुद्ध १२० बी अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गाझीपूरमधील मोहम्मदाबाद पोलिस ठाण्यात अन्सारी विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या एक वर्षात अन्सारी याला चार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. अवधेश राय हे माजी मंत्री आणि पिंडरा येथील आमदार आणि आताचे काँग्रेसचे प्रांतीय अध्यक्ष अजय राय यांचे मोठे भाऊ होते. अजय राय यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलेआहे. मोठ्या भावाची निर्घृण हत्या करणाऱ्याला न्यायालयाकडून कठोरात कठोर शिक्षा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच आपल्या मोठ्या भावाची हत्या करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध तीन दशकांहून अधिक काळ लढा देत असल्याचेही त्यांनी सांगितले. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. कुटुंबीय आणि वकिलांचे आभार मानत ते म्हणाले की, मी राहू की नाही, पण या लोकांनी लढा सुरूच ठेवला. (UP Mafia Don Mukhtar Ansari)

अवधेश राय यांची अशी झाली होती हत्या

३ ऑगस्ट १९९१ रोजी वाराणसीमधील चेतगंज पोलीस स्टेशन हद्दीतील लहुराबीर भागात राहणारे काँग्रेस नेते अवधेश राय हे त्यांचे भाऊ अजय राय यांच्यासोबत घराबाहेर उभे होते. सकाळची वेळ होती. याचवेळी व्हॅनमधून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेने संपूर्ण पूर्वांचल हादरले होते. माजी आमदार अजय राय यांनी मुख्तार अन्सारी याला या प्रकरणात मुख्य आरोपी बनवले होते. त्यासोबतच या प्रकरणात भीम सिंह, कमलेश सिंह आणि माजी आमदार अब्दुल आणि राकेश न्यायमूर्ती यांचीही नावे होती. यापैकी कमलेश आणि अब्दुल यांचा मृत्यू झाला आहे. राकेश न्यायमूर्तीचा खटला प्रयागराज न्यायालयात सुरू आहे.

हे ही वाचा :

Back to top button