शिवस्मारकासाठी दिल्लीकर मराठी बांधव सरसावले, लोकवर्गणीतून पूर्णाकृती पुतळा उभारणार | पुढारी

शिवस्मारकासाठी दिल्लीकर मराठी बांधव सरसावले, लोकवर्गणीतून पूर्णाकृती पुतळा उभारणार

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० व्या राज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मराठी मोर्चाने राजधानी दिल्लीत लोकवर्गणीतून महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा निर्धार केला आहे. पुतळ्यासाठी दिल्लीत जागा उपलब्ध करवून देण्यासाठी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवू, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष आनंद रेखी यांनी दिली.

लोकवर्गणीतून महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील सर्वपक्षीय नेते, इतर राज्यातील आणि परराष्ट्रात राहणारे शिवभक्त यांची मदत घेण्यात येईल, असे रेखी यांनी स्पष्ट केले. संघटनेला आर्थिक सहाय्य करण्यासाठी दिल्लीतील अनेक मराठी संघटनांकडून हात पुढे केला जात असल्याची माहिती संघटनेचे कोषाध्यक्ष सुभाष लोखंडे यांनी दिली.

राजधानीत पुतळ्यासाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर तात्काळ स्मारक उभारण्याचे काम सुरू करू, असे देखील राष्ट्रीय मराठी मोर्चाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच दिल्लीकर मराठी बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेवरील गुरूग्राम परिसरात महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची मागणी केली होती.

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दिल्लीत महाराजांचे स्मारक उभारणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. आता राष्ट्रीय मराठी मोर्चाने निधी संकलनातून पुतळा उभारण्याची भूमिका घेतल्याने राज्य सरकारकडून छत्रपतींचा पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेला वेग येईल, असे म्हटले जात आहे.

Back to top button