Shri Ram Temple: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण २६ जानेवारीआधी | पुढारी

Shri Ram Temple: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण २६ जानेवारीआधी

अयोध्या : वृत्तसंस्था; अयोध्येत उभारल्या जात असलेल्या अतिभव्य श्रीराम मंदिराचे लोकार्पण येत्या २६ जानेवारीच्या आधीच होणार आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने डिसेंबर ते २६ जानेवारी मधील वेळ देण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली जाणार असल्याचे सांगितले आहे.

कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत शरयूतीरी भव्य राम मंदिराची उभारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आता मंदिराच्या उद्घाटनाचे वेध लागले आहेत. रामजन्मभूमी आणि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मंदिर उभारणी आणि श्रीरामाची देखणी मूर्ती तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. ते पूर्ण झाले की, डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यांत मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे. २६ जानेवारीच्या आधी मंदिराचे उद्घाटन व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसारच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीतील तारीख देण्याची विनंती ट्रस्ट करणार आहे.

मूर्तीचे काम तीन ठिकाणी

चंपत राय म्हणाले की, रामलल्लाच्या मूर्ती तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. कर्नाटकचे डॉ. गणेश भट, जयपूरचे सत्यनारायण पांडेय आणि कर्नाटकचे अरुण योगीराज हे तिघे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून मूर्ती साकारत आहेत.

‘रामायण सर्किट’ वेगाने पूर्ण करणार : मोदी

भारत आणि नेपाळदरम्यान प्रस्तावित रामायण सर्किट प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण केले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत दौऱ्यावर आलेले नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याशी द्विपक्षीय चर्चेनंतर गुरुवारी केली. नेपाळ-भारत भागीदारी हिट ते सुपरहिट करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. उभय नेत्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याशिवाय भारत आणि नेपाळमधील नेबरहड फर्स्ट धोरणावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. यावेळी जलविद्युत विकास, कृषी आणि कनेक्टिव्हिटी या विषयांवर विचारविनिमय झाला.

हेही वाचा:

Back to top button