अयोध्येत राम मंदिर घडविणारे हात साकारताहेत संत तुकोबांचे मंदिर

अयोध्येत राम मंदिर घडविणारे हात साकारताहेत संत तुकोबांचे मंदिर

किरण जोशी

पिंपरी : संत तुकोबारायांना जेथे अभंगवाणी स्फुरली, त्या भंडारा डोंगरावर त्यांचे भव्य मंदिर उभे राहात असून, अयोध्येतील राम मंदिराचेच दगड आणि तेच कारागीर हे मंदिर घडविण्याचे काम करीत आहेत. संत तुकाराम महाराजांचा जीवनपट उलगडावा आणि डोंगरावर येणार्‍या हजारो भक्तगणांना अध्यात्मिक सुखाची अनुभूती घडावी यासाठी हे मंदिर उभारले जात आहे, अशी माहिती श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद-पाटील यांनी दिली.

शास्त्रशुद्ध पद्धतीने मंदिराची रचना करण्यात आली आहे. राजस्थानातील बन्सीपहाडपूर येथून गुलाबी दगड आणि मकराना पांढर्‍या दगडात हे मंदिर साकारले जात आहे. विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिरासाठी ज्या खाणीतून दगडांचा पुरवठा
होत आहे, तेथूनच संत तुकोबारायांच्या मंदिरासाठी दगड येत आहेत.

राम मंदिराचे भव्य मंदिर साकारणारे वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनीच या कामाची जबाबदारी घेतली असून वास्तुविशारद परेशभाई सोमपुरा यांनी डोंगरावरच मुक्काम करून या कामात स्वत:ला झोकून दिले आहे. मंदिरासाठी शंभर कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असून वारकरी संप्रदायाकडून या निधीचे संकलन सुरू आहे.

नागरशैली अन् सुरेख कोरीवकाम
नागरशैलीतील हे मंदिर गुजरातमधील अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर बनविण्यात येत आहे. पाया आणि खांबांचे काम पूर्ण झाले आहे. मंदिराला तीन कळस असणार आहेत. एकाचवेळी असंख्य भक्त दर्शन घेऊ शकतील, असा 87 फुटांच्या उंचीचा मुख्य कळस असेल. मुख्य जागेवर विठ्ठल-रुक्मिणी आणि संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. बन्सीपहाडपूर गुलाबी दगडात संत तुकोबारांच्या जीवनावरील काही प्रसंग कोरण्यात येत आहेत.

मंदिर उभारणीसाठी सोडली नोकरी
लाखोंचे पॅकेज असणार्‍या डॉ. पंकज गावडे या अभियंत्याने नोकरीवर पाणी सोडून मंदिर उभारणीच्या कामात स्वत:ला वाहून घेतले. 50 कोटी निधी संकलित करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. संत तुकारामांनी समर्पणाची भावना शिकविली. त्याच भावनेतून कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून मी हा संकल्प केला आहे, असे डॉ. गावडे यांनी सांगितले.

दानशूरतेची सर्वत्र कीर्ती, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व पूर्ण मनोरथ…! संत तुकाराम महाराजांच्या या शब्दांप्रमाणे मंदिर उभारणीचा संकल्प सकल वारकरी संप्रदाय तडीस नेत आहे. महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती देणारे हे मंदिर वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी दानशूरांनी पुढे यावे.

            – जगन्नाथ नाटक-पाटील, समन्वयक, मंदिर बांधकाम समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news