ST Bus : लालपरीला झाली 75 वर्ष पूर्ण; आधुनिकतेकडे वाटचाल करत नव्या योजनांची अंमलबजावणी | पुढारी

ST Bus : लालपरीला झाली 75 वर्ष पूर्ण; आधुनिकतेकडे वाटचाल करत नव्या योजनांची अंमलबजावणी

शाम पाटील

१ जुन १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली एसटी (ST Bus)धावली. या घटनेला येत्या एक जूनला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत.अर्थात, एसटीचा हा अमृतमहोत्सवी वर्धापन दिन आहे. ग्रामीण भागात लाल परी म्हणून ओळखली जाणारी एस.टी आता 75वर्षाची झाली आहे.

गेली ७५ वर्ष ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, चांद्यापासून बांद्यापर्यंत, गाव खेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत ” बहुजन हिताय,बहुजन सुखाय.!” हे ब्रीद घेऊन एसटी (ST Bus) सर्वसामान्य जनतेची सेवा करीत आली आहे. यापुढे देखील करीत राहील आणि भविष्यात शतकोत्तर महोत्सव एसटी दिमाखात साजरा करेल..! यात तीळ मात्र शंका नाही.

७५ वर्षात एसटीने (ST Bus) समाजाला काय दिलं? असा ज्यावेळी प्रश्न पडतो,तेव्हा महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाचा टेंभा अगदी सुरुवातीपासून अभिमानाने मिळवण्याचं धारिष्ट फक्त एसटीने दाखविले आहे. हिंदूंची देव-देवळे, नदीची घाट, अनेक उद्याने हे ज्या काळामध्ये अस्पृश्यांसाठी आणि इतर खालच्या जातींसाठी अवैध होते अथवा बंद होते, त्या काळात देखील एकाच एसटीमध्ये सर्व जाती, धर्माचे, पंथाचे लोक बसून एकत्र प्रवास करत होते . म्हणून खऱ्या अर्थाने सामाजिक अभिसरणाचा वस्तुपाठ एसटीने आपल्या जन्मापासून घालून दिला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांच्या जेवनाचे डबे पोहोचवणे, सासरी केलेल्या आपल्या मुलीला माहेरकडून नारळाची पोती आणि गोडधोड शिदोरी चे डबे घेऊन जाणे, वर्तमानपत्राचे गट्टे गावागावात पोहोचवणे अशा अनेक एसटी सोबतच्या आठवणी आता इतिहास जमा झालेल्या आहेत. आधुनिकतेमुळे माणसाच्या या गरजा एसटीवर अवलंबून राहिलेला नाहीत. तरीदेखील आजच्या काळात एसटीचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही.

समाजातील शालेय विद्यार्थी-विदयार्थीनी, दिव्यांग,विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती पत्रकारांपासून आता नव्याने सुरू केलेल्या अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक व महिला अशा ३० पेक्षा जास्त घटकांना शासनाने एसटीच्या माध्यमातून दिलेल्या सवलतींमुळे एसटी या सगळ्यांसाठी मायमाऊलीच वाटते.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान….

गेल्या अनेक वर्षापासून कळकट -मळकट, जीर्ण झालेल्या (ST Bus)बस स्थानकाच्या इमारती, पाण्याची डबकी , चिखलमय झालेला बस स्थानक परिसर, दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृह आणि अस्वच्छ बसेस यामुळे विटलेल्या प्रवाशांना एक प्रसन्न, स्वच्छ,सुंदर वातावरणामध्ये प्रवास करण्याचा आनंद मिळावा या उद्देशाने एसटी महामंडळांनी स्पर्धात्मक स्वरूपात स्वच्छता अभियान राबवण्याचा संकल्प केला आहे. ” आपलं गाव, आपलं बसस्थानक” या संकल्पनेवर आधारित जास्तीत जास्त लोकसहभागातून बस स्थानकाचा विकास, सुशोभीकरण, सौंदर्यकरण आणि दररोजची स्वच्छता करणे अपेक्षित आहे.

यासाठी करोडो रुपयांचे बक्षीस हे अभियानाच्या शेवटी पहिला क्रमांकाच्या बसस्थानकांना मिळणार आहेत.(ST Bus) बस स्थानक हे त्या गावच्या मध्यवर्ती ठिकाणी असते. त्यामुळे ते त्या गावची ” शान ” असली पाहिजे! लोकांना त्या बसस्थानकाचा अभिमान असला पाहिजे! त्यासाठी लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे बस स्थानकाच्या विकासासाठी पुढे आलं पाहिजे..!हा या अभियानामध्ये मुख्य आत्मा राहणार आहे. अनेक ठिकाणी स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळ, दानशूर व्यक्ती ,लोकप्रतिनिधी यांनी या योजनेचा स्वागत करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील केली आहे. हे अभियान न राहता ती एक चळवळ बनली पाहिजे अर्थात त्याचा थेट फायदा सर्वसामान्य प्रवासी जनतेलाच होणार आहे. भविष्यात एसटीच्या प्रत्येक बस स्थानकाचे रूपडं पालटलं तर गुणात्मक दर्जा राखल्याबद्दल एसटीची प्रशंसास होईल.

नवीन बसेस….

काेरोना महामारी आणि दीर्घकाळ चाललेला कर्मचाऱ्यांचा संप यामुळे मागील दोन अडीच वर्षांमध्ये एसटीच्या(ST Bus) नवीन बसेस ची खरेदी ठप्प झाली होती. त्यामुळे एसटीकडे असलेल्या जुन्या बसेस रूपांतरित करून आणखीन काही काळ चालवणे एसटीला भाग होते. सध्या दहा वर्षापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या निम्म्यापेक्षा जास्त बसेस आहेत. त्यामुळे तांत्रिक बिघाडाचे मार्गस्थ बिघाडाचे प्रमाण वाढलेले आहे. प्रवाशांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी एसटीने नव्या बसेस खरेदी करण्याचा मेगा प्लॅन आखलेला आहे. यंदा त्यापैकी एक हजार नव्या बसेस दाखल देखील झालेल्या आहेत.

विशेष म्हणजे नवीन साध्या लालपरी (ST Bus)मध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न एसटीने केलेला आहे. मोठ्या खिडक्या, सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहील अशी अंतर्गत रचना, पुशबॅक आसने,मोबाईल चार्जिंग करण्याची सोय अशा आधुनिक काळातील सोयी सुविधांनी सज्ज बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने उतरवले आहेत. भविष्यात या बसेसची संख्या वाढत जाईल तसे एसटीचा वाहन ताफा तरुण होत जाईल. त्यामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा सुरक्षित प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

.हेही वाचा 

प्रवाशांना मिळेना माफक दरात “चहा-नाश्ता’, एसटी महामंडळाच्या योजनेचा उडला बोजवारा

पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई एसटी धावण्यास सुरुवात

नगर: एसटी बसस्थानकांचे रूपडे पालटणार, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; जिल्ह्यातील 29 बस स्थानकांचा समावेश

 

Back to top button