नगर: एसटी बसस्थानकांचे रूपडे पालटणार, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; जिल्ह्यातील 29 बस स्थानकांचा समावेश | पुढारी

नगर: एसटी बसस्थानकांचे रूपडे पालटणार, स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान; जिल्ह्यातील 29 बस स्थानकांचा समावेश

नगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाने स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान हाती घेतले आहे. या अभियानाचा कालावधी एक वर्षाचा असून, या अभियानात राज्यभरातील 580 पेक्षा अधिक बसस्थानके सहभागी होणार आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 29 बसस्थानकांचा समावेश आहे. या अभियानामुळे जिल्हाभरातील बसस्थानके चकाकणार आहेत.

सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे बसस्थानकांत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यास महामंडळ कमी पडत आहे. त्यातून शहरातील निमशहरांतील तसेच ग्रामीण भागातील बहुतांश बसस्थानकांत स्वच्छतेचा अभाव आहे. एकंदरीत सर्वच बसस्थानकांची अवस्था बकाल झाली आहे.

एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बसस्थानके, स्वच्छतागृह, बसस्थानक परिसर व प्रवासी बस या स्वच्छ व टापटीप असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यामुळे महामंडळाने स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या अभियानाच्या स्पर्धेसाठी बसस्थानकांची ‘अ’ वर्ग (शहरी),‘ब’ वर्ग (निमशहरी) आणि ‘क’वर्ग (ग्रामीण) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात होणार असून, यासाठी सुमारे 2 कोटीपेक्षा अधिक रकमेचे बक्षीस जाहीर केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात प्रदेशनिहाय अ, ब आणि क वर्गासाठी स्पर्धा होणार असून, दुसर्‍या टप्प्यात प्रत्येक प्रदेशातून प्रत्येक गटामध्ये पहिला आलेल्या बसस्थानकांसाठी राज्यस्तरावर अंतिम स्पर्धा रंगणार आहे.

लोकसहभागातून कामे या अभियानातील जास्तीत जास्त कामे लोकसहभागातून होणार आहेेत. यासाठी आवश्यक निधीची उभारणी विविध स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, प्रवासी संघटना, महिला बचतगट, तरुण मंडळे यांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून तसेच वेगवेगळ्या घटकांनी केलेल्या श्रमदानातून केले जावे, असे निर्देश महामंडळाने विभागीय कार्यालयांना दिले आहेत.

वर्तवणूक आणि उत्पन्नाचीही दखल

स्पर्धेसाठी बसस्थानक व बसस्थानकाचा परिसर, बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे, प्रवासी बस यांच्या स्वच्छतेबरोबरच सुशोभीकरण व टापटिपपणासाठी अधिकाधिक गुण मिळणार आहेत. या अभियानात कर्मचार्‍यांची आरोग्य तपासणी, प्रवाशांसोबत सौहार्दपणे वागणे, उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न, बसचा वक्तशीरपणा या घटकांना देखील गुणात्मकरित्या विशेष महत्त्व देण्यात येणार आहे.

Back to top button