हेडन म्हणतो, पाकिस्तानला विराट, रोहित नाही तर ‘या’ खेळाडूंकडून असणार धोका! | पुढारी

हेडन म्हणतो, पाकिस्तानला विराट, रोहित नाही तर 'या' खेळाडूंकडून असणार धोका!

दुबई : पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन पाकिस्तानचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. त्याने २४ ऑक्टोबरला होणाऱ्या हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामन्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. हेडन म्हणतो की या हाय व्होल्टेज सामन्यात चुका करण्याची फारशी मुभा नाही. पण, हा सामना नेतृत्वासाठी फार मोठा असणार आहे. ज्याचे नेतृत्व चांगले तोच सामन्याचा निकाल ठरवले. हेडन यासाठी आयपीएल फायनलचे उदाहरण देतो. एमएस धोनी आणि इऑन मॉर्गन हे दोघेही फलंदाजीत अपयशी ठरले मात्र त्यांनी आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहचवले.

हेडन माध्यमांशी बोलताना म्हणाला ‘या दोघांचाही वैयक्तिक कामगिरी लौकिकास साजेशी नव्हती. मात्र या दोघांनी आपल्या संघाचे असे नेतृत्व केले की या दोघांचेही संघ युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल फायनलमध्ये पोहचले. माझ्या मते युएईमध्ये नेतृत्वगुण फार महत्वाचे आहेत. युएईमधील परिस्थिती तुम्हाला चुका करण्याची मुभा देत नाही.’

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम बद्दल हेडन म्हणाला, ‘बाबर आझमवर संघातील प्रमुख फलंदाज आणि कर्णधार असे अतिरिक्त दडपण असणार आहे. सर्वजण त्यालाच लक्ष्य करण्यासाठी सर्वजण आतूर असणार. बाबरकडे नेतृत्वगुण आहेत. त्याला आता फलंदाज म्हणून आणि कर्णधार म्हणूनही भुमिका बजावावी लागणार आहे.’

मी केएल राहुलचा प्रवास पाहिला आहे : हेडन

हेडनने पाकिस्तानला कोणत्या भारतीय खेळाडूंकडून जास्त धोका आहे हेही या मुलाखतीत सांगितले. तो म्हणतो, ‘मी कमी अधिक प्रमाणात केएल राहुलचा प्रवास पाहिला आहे. तो पाकिस्तानसाठी मोठा धोका आहे. त्याला मी लहान असल्यापासून पाहत आलो आहे. मी त्याचा संघर्ष पाहिला आहे आणि मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधले त्याचे वर्चस्व पाहिले आहे. मला ऋषभ पंतचे नेचर आणि खेळाची समज खूप आवडते. तो ज्या प्रकारे गोलंदाजांच्या चिंधड्या करतो ते वाखाण्या जोगे आहे.’

हेही वाचा : फॉर्ममध्ये नसलेल्या इऑन मॉर्गन याची वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच मोठी घोषणा

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज भारत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबाबत म्हणाला, ‘एक ऑस्ट्रेलियन म्हणून सहाजिकच आहे की अॅशेस आणि इंग्लंड विरुद्धचे सामने सर्वोच्च असणार आहेत. पण भारत आणि पाकिस्तान संघातील जी कट्टरता आहे त्याची तोड नाही.’ तो पुढे म्हणाला की पाकिस्तानकडे काही चांगले खेळाडू आहेत ते कोणत्याही दिवशी चांगली कामगिरी करु शकतात. त्याने पाकिस्तानकडून बाबर आझम, रिझवान आणि फकर झमान हे खेळाडू चांगली कामगिरी करु शकतात असे सांगितले.

Back to top button