पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन देशवासियांसाठी गौरवास्पद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन देशवासियांसाठी गौरवास्पद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशवासियांना अभिमान वाटेल अशा नव्या संसदेच्या वास्तूमध्ये लोकशाही अधिकच बळकट होईल. काही लोकांकडून या कार्यक्रमावर आक्षेप घेतला जात आहे हे दुर्दैव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरात लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळेच विरोधकांना पोटदुखी आहे. देशातील जनता मात्र पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या हस्ते नवीन संसदेचं उद्घाटन देशवासियांसाठी गौरवास्पद आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी दिल्ली येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आज (दि. २८) स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वा. सावरकरांना अभिवादन केले. यावेळी भाजप आणि शिंदे गटाचे खासदार उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती पहिल्यांदाच महाराष्ट्र भवनात साजरी होत आहे हे अभिमानास्पद आहे. पण काही लोकांना सावरकरांच वावडं आहे आणि त्यांच्याच जयंती दिवशी नवीन संसद भवनाच्या लोकार्पणाचा कार्यकम पंतप्रधान मोदी यांनी आयोजित केल्याने विरोधक आक्षेप घेत आहेत. विरोधकांकडून सोहळ्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. घराणेशाहीमध्ये अडकलेल्या पक्षांना देशाचे कल्याण, संस्कृती, हिंदूत्ववाद आणि सावरकरांच वावड असल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील जनता मात्र पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी आहे. विरोधकांनी घेतलेला आक्षेप दुर्दैवी आहे. मोदींनी जगभरात लोकप्रियतेच शिखर गाठलं आहे. देशाचा विकास सुरू असताना विरोधकांना पोटदुखी होत आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.

मोदींच्या हस्ते संसदेचं उद्घाटन देशवासियांसाठी गौरवास्पद

या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वा. सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधून संसदेच लोकार्पण होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. संसद हे लोकशाहीच पवित्र मंदिर आहे. विरोध हा एका व्यक्तीला असावा, पण जनतेला न्याय देण्याच हे काम होतं त्याच्यावर बहिष्कार घालणे हे दुर्दैवी आहे. या आधीही उद्घाटने झाली आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसदेचं उद्घाटन ही देशवासियांसाठी गौरवास्पद आहे. सगळ्यांना या सोहळ्याच निमंत्रण पाठवलं होतं. मात्र सावरकरांच्या जयंती दिवशी उद्घाटन असल्याने विरोधकांना वावड आहे. मोदींनी कितीही चांगलं काम केलं तरी विरोधकांना त्यांची अॅलर्जीच आहे. लोकशाहीच हे पवित्र काम आहे, लोकशाही टिकवायची असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे होते. जनता विरोधकांना संसद भवनाचा नाही तर घरचा रस्ता दाखवतील, असेही शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button