

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली आहे. याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी करण्यात केली असून चाकणकर आज आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. हे पद तीन वर्षांसाठी असेल.
विजया रहाटकर यांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी चाकणकर यांची नियुक्ती होणार हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी 'रावणांना वाचवणाऱ्या शुर्पणखेच्या हाती सूत्रे देऊ नयेत' अशी टीका केली होती. त्यानंतर वाघ यांना प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.
दरम्यान, मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार व हत्येची घटना तसेच महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी टीका केली होती. त्याचवेळी राष्ट्रीय महिला आयोगानेही हे पद रिक्त असल्याने त्यावरही टीका झाली होती.
राष्ट्रवादीतून रुपाली चाकणकर यांचे नाव या पदासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळांचे वाटप झाले असून त्यात हे पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटणीला गेले होते. त्यानुसार चाकणकर यांचे नाव चर्चेत होते. गेल्या काही दिवसांपूर्वी चाकणकर यांची नियुक्ती होणार असल्याची बातमी आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करून टीका केली होती. मात्र, त्यात नामोल्लेख टाळला होता.
चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेल्यानंतर त्यांच्याजागी रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. चाकणकर यांनी गेल्या दोन वर्षांत प्रदेशाध्यक्षा म्हणून आक्रमकपणे काम केले. भाजपच्या अनेक नेत्यांवर टीका करताना प्रत्युत्तरही देण्यात त्या आघाडीवर असतात. महिलांच्या प्रश्नात त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नगरसेविका ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
चित्रा वाघ यांनी एक सूचक ट्विट केले होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले होते. त्यात म्हटले होते, 'महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा; पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल.'
हेही वाचा :