प्रियांका गांधीच्या अटक केल्यावर सेल्फी घेणाऱ्या महिला पोलिसांवर होणार कारवाई? | पुढारी

प्रियांका गांधीच्या अटक केल्यावर सेल्फी घेणाऱ्या महिला पोलिसांवर होणार कारवाई?

आग्रा, वृत्तसंस्था

पोलिस कोठडीत मरण पावलेल्या अरुण याच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आग्रा येथे जात असलेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना लखनौ-आग्रा एक्स्प्रेस मार्गावर पोलिसांनी रोखले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी पोलिसांशी हुज्जतही घातली. प्रियांका गांधी यांना कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यावेळी महिला पोलिसांनी प्रियांका यांच्यासोबत सेल्फी घेतल्या. मात्र, ही बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

चोरीच्या एका गुन्ह्यात आग्रा पोलिसांनी सफाई कामगार अरुण याला ताब्यात घेतले होते. पोलिस कोठडीतच अरुण याचा मृत्यू झाला. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. प्रियांका गांधी यांना आग्रा येथे जाण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला; मात्र प्रियांका यांनी पोलिसांना जुमानले नाही. अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

प्रियांका गांधी तसेच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांना तूर्त आग्रा शहरात प्रवेश मिळणार नाही, असा अहवाल जिल्हाधिकारी प्रभू एन. सिंह यांनी शासनाला पाठविला आहे. सफाई कामगाराच्या कोठडीतील मृत्यूमुळे परिस्थिती ज्याप्रमाणे बिघडली आहे, ती पाहता या नेत्यांच्या आग्रा शहरातील प्रवेशाने कायदा व सुव्यवस्था संकटात येऊ शकते, असा शेराही जिल्हाधिकार्‍यांनी मारला आहे.

प्रियांका गांधी यांना अटक केल्यानंतर महिला पोलिसांशी त्या खूप अदबीने वागत होत्या. त्यामुळे भारावलेल्या पोलिसांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली. हा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत.

Back to top button