इस्रायली समुद्रात सापडली ९०० वर्षांपूर्वीची तलवार | पुढारी

इस्रायली समुद्रात सापडली ९०० वर्षांपूर्वीची तलवार

तेल अविव : अनेक रहस्यमयी पुरातन वस्तू आपल्या पोटात घातलेल्या इस्राईलच्या समुद्रात नुकतीच 900 वर्षांपूर्वीची तलवार सापडली. एका पाणबुड्याला देशाच्या उत्तर किनारपट्टीनजीक समुद्रात ही तलवार सापडली. इस्रायली भूमीवर धर्मयुद्ध लढलेल्या एखाद्या सैनिकाची ही तलवार असू शकते, असे म्हटले जात आहे.

इस्रायली पुरातत्त्व विभागाशी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांनी सांगितले की, अ‍ॅटलिट येथे राहणार्‍या श्लोमी काटजिन कार्मेल हे समुद्रकिनारी खोल पाण्यात डुबकी मारत होते. यावेळी त्यांना समुद्राच्या तळावर एक तलवार दिसून आली. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओही तयार करण्यात आला आहे. काटजिन ही तलवार घेऊन उत्तर जिल्ह्यातील प्राचीन वस्तू संग्रहालयात गेला आणि तेथे तलवार जमा केली. उल्लेखनीय म्हणजे सुमारे 900 वर्षांनंतरही ही तलवार अत्यंत सुस्थितीत आहे.

इस्रायली पुरातत्त्व अधिकार्‍यांनी सांगितले की, ही तलवार अत्यंत सुंदर आहे. खरोखरच हा एक अत्यंत दुर्मीळ शोध आहे. या तलवारीला प्रथम स्वच्छ करण्यात येईल आणि सखोल संशोधन केल्यानंतरच ती प्रदर्शनात ठेवण्यात येईल. ही तलवार सुमारे तीन मीटर लांब आहे. सुमारे 9 शतके पाण्यात राहिल्याने या तलवारीवर अनेक वस्तू चिकटल्या आहेत. ज्या ठिकाणी समुद्रात ही तलवार मिळाली तेथून जवळच हाइफा नामक बंदर आहे. हे बंदर पूर्वीच्या काळात शरणार्थींचे शहर होते.

Back to top button