

इटानगर ; वृत्तसंस्था : अरुणाचल प्रदेशात चीनला पूर्व लडाखप्रमाणे कुठलीही संधी न देण्याच्या द़ृष्टीने भारतीय लष्कराने तयारी चालवली आहे. चीनकडून आगळीक झाल्यास मोर्चा सांभाळण्यात काडीचीही आडकाठी नको म्हणून 'अरुणाचल सेक्टर'मधील 1 हजार 350 किलोमीटर लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) रस्ते व भुयारांचे जाळे विणले जात आहे.
इस्रायलकडून उपलब्ध झालेली ड्रोन विमाने तसेच विशेष हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून अद्ययावत निगराणी यंत्रणाही (हायटेक सर्व्हिलन्स सिस्टीम) या भागात उभारण्यात आली आहे. यामुळे चीनच्या या भागातील प्रत्येक लहानमोठ्या हालचालींची माहिती भारतीय लष्कराला तातडीने उपलब्ध होत आहे.
अरुणाचलमध्ये सीमेपर्यंत तत्काळ पोहोचता यावे म्हणून रस्ते व भुयारांचे बांधकाम वेगात सुरू आहे, असे 'पीटीआय'च्या वृत्तानुसार सीमा मार्ग विभागाचे अभियंता अनंतकुमार सिंग यांचे म्हणणे आहे. सिंग यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या माहितीनुसार 20 मोठे पूल या भागात उभारले जात आहेत. रणगाडे आणि तत्सम अवजड वाहनांचा भार पेलू शकतील, अशा क्षमतेचे हे पूल असतील.
दुसरीकडे इस्रायलकडून प्राप्त झालेले व दीर्घकाळ उड्डाण करू शकणारे हेरोन ड्रोन भारतीय लष्कराला महत्त्वपूर्ण डेटा तसेच छायाचित्रे उपलब्ध करून देत आहेत. लष्कराच्या कमांड तसेच नियमन केंद्रांना त्यामुळे सीमेपलीकडे काय चालले आहे, याची तत्काळ माहिती उपलब्ध होत आहे.
रूद्र ही अद्ययावत व शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्सही तैनात आहेत. रूद्रने भारतीय लष्कराची सीमेवरील ताकद वाढलेली आहे. '5 माऊंटन डिव्हिजन'चे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल जुबिन ए. मीनावाला यांनीही या सगळ्या माहितीला दुजोरा दिला आहे.
* लष्कराची '5 माऊंटन डिव्हिजन' बूमला पासून ते भूतानच्या पश्चिम भागापर्यंत सीमेच्या निगराणीची जबाबदारी सांभाळते.
* याच भागातील नेचिफू आणि सेला या ठिकाणांजवळ वर्षभर ये-जा केली जाऊ शकते, अशी भुयारे तयार केली जात आहेत. पुढच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ही मोठी भुयारे तयार झालेली असतील.
* तेंगापासून ते इटानगरपर्यंत महत्त्वपूर्ण मार्ग तयार केला जात आहे. तवांग ते शेरगावपर्यंत वेस्टर्न क्सेस रोडच्या बांधकामाला वेग.
* तवांग भागाला रेल्वेशी जोडण्यावरही वेगाने काम सुरू आहे.
शत्रू आता आम्हाला बुचकळ्यातही टाकू शकणार नाही. अचानक व एकतर्फी हल्ला करून आश्चर्याचा धक्काही देऊ शकणार नाही. आता आम्हाला आमचे टार्गेट काय असेल, याची आधीच माहिती मिळते आहे आणि आमचा स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक संभाव्य परिस्थितीचा आम्ही यशस्वीपणे मुकाबला करू, याबद्दल आश्वस्त असावे.
-जुबिन ए. मीनावाला, कमांडिंग मेजर जनरल, '5 माऊंटन डिव्हिजन'चे जनरल ऑफिसर