पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रचंड राजकीय नाट्यानंतर अखेर आज (दि.१८) कर्नाटक मुख्यमंत्रीपदाचा आणि पक्षांतर्गत राजकीय मतभेदाचा तिढा सुटला. अखेर पक्षश्रेष्ठींनी सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी तर डीके शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड केली. यानंतर काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची राजभवनात भेट घेत सत्तास्थापनेचा दावा (Karnataka CM swearing ceremony) केला आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले; परंतु मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. पक्षातील नाट्यमय घडामोडीनंतर कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार असतील, अशी अधिकृत घोषणा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. आता शनिवार, २० मे रोजी शपथविधी (Karnataka CM swearing ceremony) पार पडेल, असेही पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार डॉ. जी. परमेश्वर यांनी आज ( दि. १८) काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी म्हणून राजभवनात जाऊन राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेतली. काँग्रेसकडून सत्तास्थापनेविषयीची (Karnataka CM swearing ceremony) माहिती राज्यपालांना भेटून दिली आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि कर्नाटकचे आगामी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशी फोनवर चर्चा केली. यादरम्यान कर्नाटक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांना आमंत्रित केले जाणार आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे देखील शपथविधी साेहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती कर्नाटकच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने दिली आहे.