Operation Kavach : ८० टीम, १००० पोलीस कर्मचारी; जाणून घ्‍या दिल्‍लीतील ‘ऑपरेशन कवच’विषयी | पुढारी

Operation Kavach : ८० टीम, १००० पोलीस कर्मचारी; जाणून घ्‍या दिल्‍लीतील 'ऑपरेशन कवच'विषयी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली पोलिसांनी राबवलेले ‘Operation Kavach’ सध्‍या चर्चेत आहे. दिल्ली पोलिसांनी आजवर राबवलेल्‍या मोठ्या मोहिमेपैकी एक माेहिम ठरली आहे. यामध्‍ये दिल्‍ली पोलिसांच्‍या ८० पथके आणि एक हजार पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. जाणून घेवूया या ऑपरेशनविषयी…

एकाच वेळी सुमारे १०० ठिकाणी छापे

गुरुवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या युनिटला दिल्ली पोलिस आयुक्तांनी सतर्क राहण्यास सांगितले. त्यानंतर कुख्यात गुंडांवर पोलीस मोठी कारवाई करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र यावेळी पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई करण्याचे ठरवले. त्‍यानुसार दिल्ली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री धडक कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये दिल्ली पोलिसांच्या ८० टीम सहभागी झाल्या होत्या. यामध्‍ये तब्‍बल एक हजार पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश होता. ‘ऑपरेशन कवच’ हे देशभर पसरलेले अमली पदार्थांचे जाळे उखडून टाकण्यासाठी राबविण्‍यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच राज्यांना ड्रग माफियांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तेव्हापासून देशभरात पसरलेल्या अंमली पदार्थांच्या विळख्यात मोडण्यासाठी सातत्याने कारवाई केली जात आहे. या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने ही धडक कारवाई केली. दिल्लीत सुरू असलेल्या ड्रग्जचे रॅकेट उद्‍ध्‍वस्‍त करण्‍यासाठी पोलिसांनी एकाच वेळी सुमारे १०० ठिकाणी छापे टाकले.

आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांचे कंबरडे मोडले

या कारवाईत पोलिसांनी ३१ ड्रग्ज विक्रेत्यांना अटक केली. याशिवाय १२ अवैध दारू तस्करांनाही पकडण्यात आले. या छाप्यात पोलिसांनी ३५ किलो हेरॉईन, १५ किलो कोकेन, गांजा, १० किलो चरस, २३० किलो अफू आणि अवैध दारू जप्त केली. दिल्‍ली पोलिसांच्‍या या धडक कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांचे कंबरडे मोडले असल्याचे मानले जात आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईत गुप्तहेर अधिकारी आणि स्पेशल फोर्सच्या अधिकाऱ्यांशिवाय स्निफर डॉग्जचाही सहभाग होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिलेल्‍या माहितीनुसार, दिल्ली ड्रग्ज रॅकेट आणि अवैध दारू विक्रंवर दीर्घकाळ नजर होती. यावर्षी दिल्ली पोलिसांनी ‘एनडीपीएस’च्या एकूण ४१२ प्रकरणांमध्ये 534 जणांना अटक केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button