मोबाईलशिवाय तुम्ही राहू शकत नाही..! तुम्हाला नोमोफोबिया तर झाला नाही ना ? | पुढारी

मोबाईलशिवाय तुम्ही राहू शकत नाही..! तुम्हाला नोमोफोबिया तर झाला नाही ना ?

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : घरामध्ये एखादे वेळी तुमचा मोबाईल सापडला नाही तर तुम्हाला अस्वस्थ होते. काहीही सुचत नाही. तुम्ही बेचैन होता. कधी एकदा मोबाईल भेटेल असे होऊन जाते. त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही, असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्हाला नोमोफोबिया आजार होण्याची शक्यता आहे. मोबाईलच्या अतिआहारी गेलेले, नोमोफोबिया आजाराने पिडीत रुग्ण मानसोपचार तज्ज्ञांकडे तपासणीसाठी येण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.

मोबाईल फोन ही सध्या प्रत्येकाची गरज बनली आहे. मोबाईलमुळे माहितीचे मायाजाळ सर्वांसमोर खुले झाले आहे. मोबाईलवर व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टि्वटर अशा माध्यमांवर तासनतास वेळ घालविण्यात तरुणाई आघाडीवर आहे. घराघरांमध्ये संवाद कमी झाला असून मोबाईलवरील टाईमपासमध्येच बर्‍याच जणांचा वेळ जात आहे. त्यातही सध्या विविध छोट्या आकारातील रील्स (छोटे व्हिडिओ) स्क्रोल करत एकामागून एक रील्स पाहण्यात बराच वेळ घरातील मुले मश्गुल झाली असल्याचे चित्र पाहण्यास मिळते.

झोपेवरही होतो परिणाम

सतत दोन तास चेहर्‍यावर मोबाईलचा प्रकाश पडत राहिल्यास आपल्याला झोप येण्यात अडथळे निर्माण होतात. अर्थात, जास्त वेळ मोबाईल पाहत राहिल्याने झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अर्धवट झोप झाल्याने आपल्याला अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे अशा समस्या उद्भवतात.

परस्पर संवादात अडथळे

मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील आणि मित्र परिवारातील परस्पर संवादावरही परिणाम होत आहे. घरांमध्ये किंवा मित्र परिवारासोबत असतानाही बरेच जण मोबाईलमध्ये गढून गेलेले असतात. त्यामुळे त्यांचा परस्परसंवाद कमी होतो. परिणामी मैत्रीपूर्ण संबंध विकसित होण्यात अडथळे निर्माण होत आहे.

नोमोफोबिया म्हणजे काय ?

स्मार्टफोनचे लागलेले व्यसन म्हणजे नोमोफोबिया होय. या आजारात अशी भीती (फोबिया) वाटत असते की कधी आपला फोन हरवुन जाईल आणि आपल्याला त्याच्याशिवाय राहावे लागेल. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला ’नोमोफोब’ असे म्हटले जाते. स्मार्टफोनची झालेली ही सवय आपल्या शरीराबरोबरच आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करु शकते.

आजाराची लक्षणे काय ?

या आजाराच्या आहारी गेलेली व्यक्ती जर कधी घरी मोबाईल विसरुन बाहेर गेली तर तिला अस्वस्थ वाटू लागते. असुरक्षिततेची भावना निर्माण होते. चिडचिड वाढते. बेचैनी जाणवु लागते.

अतिवापरामुळे मानेचा त्रास

सतत मोबाईल फोनचा वापर केल्याने आपले खांदे आणि मान ही झुकलेल्या अवस्थेत असते. त्यामुळे पाठीच्या कण्यावर त्याचा ताण पडतो. मान झुकलेल्या स्थितीत राहिल्यास त्यामुळे आपल्याला परिपूर्ण श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. त्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो. मोबाईल स्क्रीनवर सतत नजर ठेवून असलेल्या लोकांना मानेचा त्रास जाणवतो. ही समस्या सतत टेक्स्ट मेसेज पाठविणार्‍या आणि वेब ब्राऊजिंग करणार्‍यांमध्ये आढळते.

आपल्याला नोमोफोबिया आजार झाला आहे, हे बर्‍याच वेळा रुग्णांच्या लक्षात येत नाही. हा आजार प्राथमिक स्तरावर असल्यास त्यावर स्व-नियंत्रणाद्वारे तत्काळ उपचार करता येतात. मात्र, त्यामधुन नैराश्य किंवा चिंतारोग निर्माण झाल्यास त्यासाठी औषधोपचार आणि समुपदेशन करावे लागते. मोबाईलच्या अतिआहारी जाण्यामुळे जर रुग्ण गंभीर स्थितीत पोहचला असेल तर अशा रुग्णांना मोबाईल व अन्य गॅझेटपासून दूर ठेवावे लागते.

                                    – डॉ. धनंजय अष्टूरकर, मानसोपचार तज्ज्ञ

Back to top button