पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) संचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे.
पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेल्या उच्चस्तरीय समितीची शनिवारी (दि.१३) बैठक झाली. या वेळी सीबीआय संचालकपदासाठी तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावाचा विचार झाला. अखेर प्रवीण सूद यांच्या नावावर शिक्कामाेर्तब झालं. या बैठकीदरम्यान,नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त आणि सदस्य लोकपाल म्हणून नियुक्तीच्या संभाव्य उमेदवारांवरही चर्चा करण्यात आली.
सीबीअआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जयस्वाल आहेत. ते १९८५ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी सीबीअआय संचालक पदाचा पदभार २६ मे २०२१ रोजी स्वीकारला होता. यांचा कार्यकाळ २५ मे रोजी संपत आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रवीण सूद पदभार स्वीकारतील.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) संचालकाची निवड पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असलेल्या समितीद्वारे होत असते. ही नियुक्ती दोन वर्षांच्या निश्चित कार्यकाळासाठी केली जाते. हा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.