कोची, पुढारी ऑनलाईन : Drugs Seized : भारतीय नौदलाच्या इंटेलिजन्स युनिट (नेव्हल इंटेलिजन्स) आणि एनसीबीने संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात आतापर्यंतची सर्वात मोठी ड्रग्जची खेप पकडली आहे. नौदल आणि एनसीबीने अरबी समुद्रात 2600 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत 12,000 कोटी रुपये आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले ड्रग्ज इराणमधून येत होते. गुजरातमधील बंदरात पोहोचण्यापूर्वीच ते जप्त करण्यात आले. 2600 किलो ड्रग्जसह पकडलेल्या माफियाला कोचीच्या बंदरात नेण्यात आले, जिथे एनसीबी आणि नौदल या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत. आता या संपूर्ण ड्रग्ज रॅकेटमध्ये कोणाचा हात आहे, याचा शोध घेतला जात आहे.
भारतीय नौदलाच्या नेव्हल इंटेलिजन्स युनिटला एक इनपुट मिळाले होते. काही ड्रग माफियांना अरबी समुद्रमार्गे भारताच्या कोणत्याही सागरी किनार्यावर अमली पदार्थ पोहोचवायचे आहेत, असे त्यात म्हटले होते. या इनपुटच्या आधारे नौदल आणि एनसीबीने संयुक्त कारवाई करून कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची खेप पकडली. (Drugs Seized)
नौदलाच्या जहाजाने (INS TEG F-45) अरबी समुद्र परिसरात ही अमली पदार्थाची खेप पकडली आहे. अधिकाऱ्यांनी एका ड्रग्ज माफियालाही अटक केली आहे. विशेष म्हणजे सुदानमध्ये भारतीयांच्या सुटकेसाठी आयएनएस टीईजी तैनात करण्यात आली होती. दरम्यान, सुदानमधील सर्व भारतीयांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडल्यानंतर आयएनएस टीईजीने हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले. (Drugs Seized)