Karnataka Election Results : भारत जाेडाे ते कर्नाटक विजय…कोण आहेत काँग्रेसचे नवे ‘चाणक्‍य’ सुनील कानुगोलू?

निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू ( संग्रहित छायाचित्र )
निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. ( Karnataka Election Results 2023 ) या विजयाचे श्रेय माजी पक्षाध्‍यक्ष राहुल गांधी यांच्‍यासह कर्नाटकमधील पक्षाचे प्रदेशाध्‍यक्ष डी. के. शिवकुमार यांच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांना दिले जात आहे. मात्र यंदाच्‍या निवडणुकीत काँग्रेसला गवसलेले ज्‍युनिअर प्रशांत किशोर म्‍हणजे निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू ( Sunil Kanugolu) यांचे विजयातील श्रेय मोठे असल्‍याचे मानले जात आहे. कोण आहेत सुनील कोनुगोलू ? काँग्रेसला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्‍या यशात त्‍यांचा वाटा किती? या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेवूयात…

प्रशांत किशोर यांच्‍या टीममधील सदस्‍य सुनील कानुगोलू

सुनील कानुगोलू हे मूळचे कर्नाटकचे मात्र त्‍यांचे संपूर्ण शिक्षण चेन्‍नईत झाले. त्‍यांनी आपल्‍या कामाचा प्रारंभ निवडणूक रणनीतीकार ( poll strategist) प्रशांत किशोर यांच्‍याबरोबर केला. प्रशांत किशोर यांच्‍या टीममधील ते एक प्रमुख सदस्‍य होते. २०१४ लोकसभा निवडणुकीत त्‍यांनी नरेंद्र मोदी यांच्‍या प्रचाराची रणनीती आखण्‍यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. यानंर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच त्‍यांनी तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्‍णाद्रमुक पक्षांसोबतही सोबत काम केले आहे. ( Karnataka Election Results 2023 )

मागील निवडणुकीत भाजपसाठी यंदा काँग्रेससाठी आखली रणनीती

सुनील कानुगोलू हे २०१८ कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचे निवडणूक रणनीतीकार होते. यंदा काँग्रेसने हेच काम त्‍यांना दिले. मार्च २०२२ मध्‍ये काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी त्‍यांची रणनीतीकार म्‍हणून नियुक्ती केली होती. कानुगोलू यांच्‍या टीमने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे काँग्रेसने उमेदवार निवडले. सत्ताधारी भाजपविरोधात प्रचाराचे मुख्‍य अस्‍त्र म्‍हणून भ्रष्‍टाचाराचा मुद्दा महत्त्‍वाचा ठरला. यंदाच्‍या निवडणुकीत त्‍यांनी काँग्रेससाठी नाविन्यपूर्ण प्रचार रणनीती आखली, तसेच मतदारसंघनिहाय उमेदवार निश्‍चित करण्‍यातही त्‍यांच्‍या मतांचा विचार करण्‍यात आला. काही उमेदवार वगळता काँग्रेसचे उमेदवार प्रामुख्याने सुनील कानुगोलू यांच्या टीमने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे निवडले गेले. ( Karnataka Election Results 2023 )

Karnataka Election Results :  भारत जोडो यात्रेचे नियोजनही कानुगोलू यांचेच

कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे नियोजन करण्याचे श्रेय सुनील कोनुगोलू यांनाच जाते. या यात्रेमुळे काँग्रेसला महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी लोकांशी संपर्क साधण्यात मदत झाली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्‍या भारत जोडो यात्रेचा मोठा परिणाम झाला असे आता मानले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीतही राहणार काँग्रेसचे रणनीतीकार

सुनील कानुगोलू यांची काँग्रेसने मागील वर्षीच कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी रणनीतीकार म्‍हणून नियुक्ती केली होती. यानंतर काँग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी सुनील कानुगोलू यांना पक्षाच्या २०२४ लोकसभा निवडणूक कार्यदलाचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.

सुनील कानुगोलू यांच्या प्रमुख कामांमध्ये आता तेलंगणातील काँग्रेसला पुन्‍हा एकदा मुख्‍य प्रवाहात आणणे, राजस्थान आणि छत्तीसगडमधील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवणे, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्‍हा एकदा गतवैभव मिळवून देण्‍यासाठीची रणनीती आखण्‍याची जबाबदारी आता सुनील कानुगोलू यांच्‍या टीमवर सोपविण्‍यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्‍यांची रणनीती काँग्रेस यश मिळवून देणार का याचे उत्तर २०२४ मध्‍येच मिळणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news