

असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजनांचा लाभ सहजरित्या मिळावा, यासाठी या क्षेत्रात कार्यरत कामगारांची माहिती एकत्रित करण्याचे काम केंद्र सरकारने सुरू केले आहे. याअनुषंगाने केंद्राने कामगारांची माहिती गोळा करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी 'ई-श्रम' पोर्टल सुरू केले होते. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत ४ कोटींहून अधिक कामगारांच्या नोंदण्या या पोर्टलवर करण्यात आल्याची माहिती रविवारी केंद्रीय श्रम मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. महाराष्ट्रातून आतापर्यंत ९ लाख ३७ हजार ५४ नोंदण्या करण्यात आल्या आहेत. असंघटिक कामगारांच्या नोंदणी करण्यात ओडिश राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात आतापर्यंत ८८ लाख ३५ हजार ५७२ कामगारांच्या नोंदण्या करण्यात आल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
ओडिशा पाठोपाठ पश्चिम बंगाल (८०,३५,७४२) उत्तर प्रदेश (६७,०२,९३८) , बिहार (६२,४४,२३१) , मध्यप्रदेश (१५,७९,१५१), राजस्थान (१४,१८,२७६), पंजाब (१०,३३,८६३), आसाम (९,९५,७०७), महाराष्ट्र (९,३७,०५४) तसेच छत्तीसगढचा (८,२४,२५४) क्रमांक लागतो. बांधकाम, वस्त्रोद्योग, मासेमारी, गिग आणि प्लॅटफॉर्म(ई-कंपन्या) काम, रस्त्यावरील विक्री,घरगुती काम, शेती आणि संलग्न, वाहतूक क्षेत्र अशा विविध व्यवसायातील कामगारांनी ई श्रम पोर्टल वर नोंदणी केली जात आहे.
यापैकी काही क्षेत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांचा देखील समावेश आहे. स्थलांतरित कामगारांसह सर्व असंघटित कामगार आता ई-श्रम पोर्टलवर केलेल्या नोंदणीच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगारावर आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.