राजस्‍थान काँग्रेसवर पुन्‍हा दाटले बंडाचे ‘ढग’!, जाणून घ्‍या पायलट यांचे नवे ‘राजकीय गणित’ | पुढारी

राजस्‍थान काँग्रेसवर पुन्‍हा दाटले बंडाचे 'ढग'!, जाणून घ्‍या पायलट यांचे नवे 'राजकीय गणित'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राजस्‍थान विधानसभा निवडणुक काही महिन्‍यांवर येवून ठेपल्‍या आहेत. पक्षासमाोर अनेक आव्‍हाने असताना  अशाेक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्‍यातील संघर्ष पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला आहे. ( Rajasthan politics ) गेहलोत यांच्‍याविरोधात थेट भूमिका घेत राजस्‍थानचे माजी उपमुख्‍यमंत्री सचिन पायलट हे गुरुवार ११ मेपासून अजमेर ते जयपूर अशी ‘जन संघर्ष पदयात्रा’ काढणार आहेत. यापूर्वीही त्‍यांनी अनेकवेळा गेहलोत सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र आताची त्‍यांची राजकीय लढाईही निर्णायक असल्‍याचे मानले जात आहे. ( Pilot vs Gehlot ) सचिन पायलट यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. आता त्‍यांचे विधानसभा निवडणुकीपूर्वी पुढचे पाऊल काय असेल? राजस्थानच्या राजकारणात खरोखरच मोठी उलथापालथ होणार का? याविषयी जाणून घेऊया…

 Pilot vs Gehlot : पायलट यांच्‍याकडून वारंवार बंडाचा इशारा

२०१८ मध्‍ये राजस्‍थानमध्‍ये काँग्रेसने सत्ता काबीज केली. यानंतर राज्‍यात गेहलोत विरुद्ध पायलट असा संघर्ष सुरु झाला. मागील पाच वर्षांत पायलट यांनी त्यांनी अनेकवेळा बंडाची झेंडा हाती घेतला. एकदा तर उपमुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक आमदारांसह दिल्ली गाठली होती. यावेळी राहुल गांधी यांनी त्‍यांची समजुत काढली मात्र त्‍यानंतर पायलट हे आपली मुख्‍यमंत्रीपदाची महत्त्‍वाकांक्षा पूर्ण करण्‍यासाठी सरकार पाडतील, अशी अटकळ बांधली गेली. मात्र पायलट हे काँग्रेससोबतच राहिले.

प्रत्‍येक आमदाराला भाजपकडून १० किंवा २० कोटी देण्‍यात आले : गेहलोत

मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेही सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. रविवार ७ मे रोजी त्‍यांनी पायलट यांच्‍यावर अप्रत्‍यक्ष हल्‍लाबोल केला. केंद्रीय मंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान आणि गजेंद्र सिंह शेखावत यांचे नाव घेत गेहलोत म्हणाले की, भाजप नेत्यांनी काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला.आमच्या काही आमदारांना पैसे वाटण्यात आले. प्रत्येक आमदाराला १० ते २० कोटी रुपये देण्यात आले. मात्र अपक्ष व इतर आमदारांच्या मदतीने सरकार वाचले, असा गंभीर आरोप त्‍यांनी केला. ज्या आमदारांनी भाजप नेत्यांकडून 10 किंवा 20 कोटी रुपये घेतले आहेत त्यांनी ते पैसे अमित शहा यांना परत करावेत, असा टोलाही त्‍यांनी लगावला. भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांचे कौतुक करत त्‍यांनी काँग्रेस सरकार वाचवलं, अशी धक्‍कादायक कबुलीही त्‍यांनी दिली. गेहलाेत यांच्‍या आराेपामुळे काँग्रेसमध्‍ये संघर्ष पुन्‍हा एकदा चव्‍हाट्यावर आला.

गेहलोत यांच्‍या नेत्‍या सोनिया गांधी नव्‍हे वसुंधरा राजे : सचिन पायलट

काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज ( दि. ९ ) पत्रकार परिषदेत घेत गेहलोत यांच्‍या आरोपांना उत्तर दिले. ते म्‍हणाले, “आम्ही अशोक गेहलोत यांचे भाषण ऐकले. हे ऐकून त्यांच्या नेत्या सोनिया गांधी नसून वसुंधरा राजे आहेत, असेच वाटते. एकीकडे ते म्हणत आहेत की, भाजपने आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे ते म्हणत आहेत की, वसुंधरा राजे यांनी काँग्रेसचे सरकार वाचवले. त्‍याच्‍या या विधानांमध्‍ये मोठा विरोधाभास आहे.”

२०२० मध्‍ये काय घडले हे सांगताना पायलट म्‍हणाले, तेव्हा आम्हाला नेतृत्व बदल हवा होता. आम्ही आमचे मुद्दे पक्षप्रमुखांसमोर मांडले. अनेक बैठका घेऊन समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये रोडमॅप तयार करण्यात आला. यानंतर काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेतली. हा कार्यकाळ अडीच वर्षांचा होता, त्यामध्ये आमच्याकडून शिस्तभंगाचे कोणतेही कृत्य झाले नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. ‘गेहलोत यांनी माझा जितका अपमान केला आहे तितका माझा अपमान कोणीही करू शकत नाही. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ते खोटे बोलत आहेत, असा दावाही पायलट यांनी या वेळी केला.

 Pilot vs Gehlot :  सचिन पायलट यांना काय साध्‍य करायचे आहे?

पायलट यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जन संघर्ष पदयात्रा काढण्‍याचा निर्णय ही त्‍यांची राजकीय खेळी आहे. यामधून त्‍यांना तीन गोष्‍टी साध्‍य करायच्‍या आहेत, असे मत राजस्‍थानमधील राजकीय विश्‍लेषकांनी मांडत आहेत.

१ ) सहानभूती घेवून पायलट यांचा प्रतिमा संवर्धनाचा प्रयत्‍न

सचिन पायलट यांनी जन संघर्ष पदयात्रा ११ मेपासून सुरु करण्‍यात येईल, असे जाहीर केले आहे. २०१८ मध्‍ये राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून पायलट यांनी अनेक वेळा बंडा झेंडा हाती घेतला आहे. एकदा त्‍यांनी आपल्‍या समर्थक २० आमदारांसह दिल्‍लीत तळ ठोकला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना सर्व पदांवरून हटवले होते. आता पुन्‍हा त्‍यांनी गेहलोत यांच्‍याविरोधात भूमिका घेत पक्षाला आव्‍हान दिले आहे. या कारणावरुन त्‍यांची पक्षातून हकालपट्टीही होऊ शकते.  सहानभूतीतून आपली प्रतिमा संवर्धनासाठी व्‍हावे यासाठी त्‍यांनाही ही कारवाई हवी आहे, असे मत राजस्‍थानमधील राजकीय विश्‍लेषक व्‍यक्‍त करत आहेत.

२ )  Pilot vs Gehlot : नवीन आघाडी स्‍थापन करण्‍याचा प्रयत्‍न

आता विधानसभा निवडणुकीपूर्वी सचिन पायलट आपले अस्‍तित्‍व सिद्ध करण्‍यासाठी राजकीय मैदानात उतरतील, असे मानले जात आहे. काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केल्‍यास ते नवी आघाडी करण्‍याचा प्रयत्‍न करतील, असे मानले जात आहे. ते भाजपसह आता काँग्रेसवरही भ्रष्‍टाचाराचे आरोप करत आहेत. आता  यांना दोन्‍ही पक्षासोबत जाण्‍याचे त्‍यांना रस नसल्‍याचे दिसत आहे. त्‍यामुळे ते राजस्‍थानमध्‍ये नवी आघाडी उभारण्‍याच्‍या प्रयत्‍न करतील, असाही अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

३ ) स्‍वत:चा राजकीय पक्ष स्‍थापन करणार?

असे मानले जात आहे की, सध्‍या तरी पायलट यांना भाजप किंवा काँग्रेस दोन्‍ही पक्षांमध्‍ये राहण्‍यात रस नाही. सचिन पायलट हे राजस्‍थानमधील तरुणाईतील लोकप्रिय नेते आहेत. त्‍यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ते आपला स्‍वतंत्र पक्ष स्‍थापन करतील, असे मानले जात आहे. ११ मेपासून सुरु होणार्‍या जन संघर्ष पदयात्रेतून ते हेच साध्‍य करणार आहेत. भाजप आणि काँग्रेसवर नाराज असणारा मतदार ते आपल्‍याकडे वळविण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहेत, असे मानले जात आहे. यामध्‍ये त्‍यांना यश आले तरी ते आगामी विधानसभा निवडणुकीत ‘किंगमेकर’ची भूमिका बाजावू शकतात, याची त्‍यांना जाणीव आहेत. त्‍यामुळेच एकीकडे भाजपच्‍या वसुंधरा राजे यांच्‍यावर हल्‍लाबोल करायचा तर दुसरी काँग्रेसचे होता होईल तेवढे नुकसान करायचे,हा त्‍यांच्‍या राजकीय रणनीतीचा भाग असल्‍याची चर्चा राजस्‍थानमधील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button