nformation from Praful Patel
nformation from Praful Patel

Sharad Pawar News | राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी शरद पवारांनीच रहावे, भेटून विनंती करणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा पक्षाच्या समितीने नामंजूर केला असल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पवारांना भेटून विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवारसाहेब निवृत्तीची अशी अचानक घोषणा करतील याची कल्पना नव्हती. सध्याची परिस्थिती पाहता देश राज्य आणि पक्षाला पवार साहेबांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी पवारांनीच रहावे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते आणि निवड निर्णय समिती निमंत्रक प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी निवड समिती बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. (Sharad Pawar News)

आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. शरद पवार कार्यक्रमात त्यांचा निर्णय जाहीर करतील. त्यांच्या घोषणेमुळे आम्ही आवाक झालो. पण देश, राज्य आणि पक्षाला पवारांची गरज आहे. शरद पवारांनी पद सोडू नये अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आज त्यांनी समितीवर जबाबदारी दिली होती. त्या समितीने शरद पवारांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळला असल्याचे पटेल म्हणाले.

अनपेक्षितपणे शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षाचे नेते, कार्यकर्ते नाराज झाले. पवार साहेबांनी आम्हाला विश्वासात न घेताच हा निर्णय घेतला. पण शरद पवार यांचे देशातील स्थान सर्वोच्च आहे. देशाला त्यांची गरज आहे. त्यामुळेच आज झालेल्या बैठकीत आम्ही एक ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

निवड समितीकडून मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये नमून करण्यात आला आहे की, पवार यांचा राजीनामा नामंजूर करून तो फेटाळला आहे. इथून पुढे देखील पवार साहेबच पक्षाचे प्रमुख रहावेत, असे समितीतील सर्व सदस्यांचे मत आहे.  आमच्या सर्वाच्या भावना लक्षात घेऊन, शदर पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आम्ही या प्रस्तावातून मांडली आहे. हा प्रस्ताव घेऊन आम्ही शरद पवार यांना भेटू असे प्रफुल पटेल यांनी परिषदेत स्पष्ट केले.

शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या समितीने शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे असा एकमुखी ठराव मंजूर केला. त्यामुळे आता या ठरावावर शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar News)

 हे ही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news