शरद पवार
शरद पवार

Sharad Pawar News Updates | शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या समितीने फेटाळला, निर्णयाचा चेंडू पवारांकडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या समितीने शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे असा एकमुखी ठराव मंजूर केला. त्यामुळे आता या ठरावावर शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar News Updates) राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा पक्षाच्या समितीने नामंजूर केला असल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पवारांना भेटून विनंती करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. शरद पवार कार्यक्रमात त्यांचा निर्णय जाहीर करतील. त्यांच्या घोषणेमुळे आम्ही आवाक झालो. पण देश, राज्य आणि पक्षाला पवारांची गरज आहे. शरद पवारांनी पद सोडू नये अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आज त्यांनी समितीवर जबाबदारी दिली होती. त्या समितीने त्यांचा राजीनामा सर्वानुमते फेटाळला असल्याचे पटेल म्हणाले.

आज सकाळी अकरा वाजता अध्यक्ष निवड समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून जोरदार घोषणा देत मोठी गर्दी केली होती. स्वतः समितीचे सदस्य असलेले छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीच्या आधीच शरद पवारांना अध्यक्षपद सोडता येणार नाही. त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे म्हणून बैठकीत ठराव केला जाईल असे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. या महत्त्वाच्या निवडणुका पहाता शरद पवारांनी अध्यक्षपद न सोडता आमचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडली.

बैठक सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे असा ठराव बैठकीत मांडला. तसेच हा निर्णय त्यांनी मान्य करावा म्हणून आग्रह धरण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. त्याला सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला.

आता लक्ष शरद पवारांच्या निर्णयाकडे

शरद पवारांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर करत नवा अध्यक्ष ठरविण्यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांची समिती नेमली होती. शरद पवार यांनी २ मे ला हा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हल्लकल्लोळ उडाला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा म्हणून नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांची मनधरणी चालविली आहे. गेली तीन दिवस कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सेंटर समोर धरणे देत त्यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून विनवणी करत होते. तसेच देशभरातील महत्वाच्या नेत्यांनीही पवारांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून दबाव टाकला आहे. पवारांनी नवा अध्यक्ष ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीनेही शरद पवारांनीच अध्यक्षपदी राहावे असा ठराव केल्याने आता शरद पवार आपला निर्णय मागे घेतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र शरद पवारांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून निर्णय घेण्याचे सूतोवाच आधीच केले असल्याने शरद पवार हे आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेऊ शकतात.

शरद पवार यांनी स्वतः कार्यकर्त्यांशी बोलताना अध्यक्षपदाबाबत निर्णय घेताना तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करणार नाही आणि दोन दिवसांनंतर तुम्हाला आंदोलन करावे लागणार नाही, असे सांगून निर्णयावर फेरविचार करण्याचे संकेत दिले होते. (Sharad Pawar News Updates)

 हे ही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news