Wrestlers Protest : कुस्तीपटूंना धक्का; सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका निकाली | पुढारी

Wrestlers Protest : कुस्तीपटूंना धक्का; सर्वोच्च न्यायालयाकडून याचिका निकाली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लैंगिक शोषणाचा आरोप करीत तीन कुस्तीपटूंनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी निकाली काढली. दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्ल्यूएफआय) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचिकेवरील सुनावणी त्यामुळे बंद करणे खंडपीठाने योग्य समजले. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षेतेखाली न्या.पी.एस.नरसिम्हा आणि न्या.जे.बी.पारडीवाल यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेतली. याचिकेतून सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने याचिकेचा उद्देश पुर्ण झाल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

याचिकाकर्त्यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांशी संपर्क करीत अथवा इतर तक्रारीसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य देखील खंडपीठाने दिले. सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने हस्तक्षेप करण्यास नकार देणाऱ्या दिल्ली पोलिसांचे वर्तन लक्षात घेता खंडपीठाने सेवानिवृत्त न्यायमूर्तीच्या देखरेखीखाली तपास करण्याची विनंती याचिककर्त्या कुस्तीपटूंच्या वतीने वरिष्ठ वकील नरेंद्र हुड्डा यांनी केली. याचिका निकाली काढल्यानंतर दिल्ली पोलीस हात झटकेल, अशी भीती वकिलाने व्यक्त केली. पंरतु, न्यायालयाने त्यांची विनंती फेटाळली.

सर्वोच्च न्यायालयाच्या पतळीवर कारवाई बंद करीत आहे. कुठली समस्या असल्यास न्यायदंडाधिकारी अथवा उच्च न्यायालयात दाद मागू शकता. पोलिसांनी २९ एप्रिलला अल्पवयीन आणि ३ मे ला इतर चार कुस्तीपटूंचे जबाब नोंदवला असल्याचे खंडपीठाने सांगितले. जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या सहा महिला कुस्तीपटूंना सुरक्षा पुरवण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सांगितले. एका राजकीय पक्षाचे दोन बडे नेते आंदोलनस्थळी खाटा घेवून पोहचले होते. पंरतु, त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान सौम्य धक्काबुक्की झाली. यावेळी कुठलाही पोलीस कर्मचारी दारु पिवून नव्हता, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

हेही वाचा : 

Back to top button